27.85°C Pune
Thursday, May 9
image

रोटरी क्लबने दिली देहूरोड कॅंटोमेंटच्या शाळेस स्कूलबस भेट


चिंचवड, ता. २२ : रोटरी क्लब ऑफ निगडी पुणेच्या वतीने आणि व्हिटेस्को टेक्नॉलॉजीस कंपनीच्या तळेगांव सीएसआर निधीतून देहूरोड कॅंटोमेंट बोर्डाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बस देण्यात आली. 

यावेळी प्रांतपाल मंजू फडके, अध्यक्ष हरबिंदरसिग दुल्लत , सचिव शशांक फडके, सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) संचालक रवी राजापूरकर, सेवा संचालक गणेश भालेराव,राकेश सिंघानिया,व्हीटेस्को कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग गर्ग, प्रकल्प व्यवस्थापक शफिक सय्यद, सीएसआर प्रमुख आरती देवकर, मोहसीना फैज आदी उपस्थित होते.

कॅंटोमेंट बोर्ड शैक्षणिक विभागप्रमुख एम. एफ. खान, नामनिर्देशित सदस्य ॲड. कैलास पानसरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष बंसल यांनी बसच्या चाव्या स्वीकारल्या. यावेळी अध्यक्ष दुल्लत म्हणाले, '' 

आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांना आज व्यवस्थित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तरच त्यांच्यातून उत्तम नागरीक घडेल. एका सुमोमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून नेत होते. रोटरीच्या माध्यमातून आणि व्हीटेस्को कंपनीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी वेळेत आणि सुखरूप शाळेत जाणार आहे.शैक्षणिक मदत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. '' 

केंद्र प्रमुख खान म्हणाल्या, '' देहूरोड कॅंटोमेंट बोर्डाच्या शाळेत शेलारवाडी, चिंचोली, झेंडेमळा अशा ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ९० आहे. आमच्याकडे विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी एकच सुमो असल्याने खूप अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यासाठी आम्हांला बसची अत्यावश्यकता होती. रोटरी क्लबकडे मागणी करताच त्यांनी तातडीने हालचाल केली. शेवटी आम्हाला एक स्कूल बस मिळाली.यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. '' 

गर्ग म्हणाले, '' सुरक्षितता ही केवळ उद्योगासाठीच नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांसाठीदेखील आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सुरक्षेला प्राधान्य देत विटेस्कोने या उपक्रमाला पाठिंबा दिला. आणि शाळेस बस देण्याचा निर्णय घेतला.'' राकेश सिंघानिया यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

___