32.86°C Pune
Monday, May 20
image

स्वतः गद्दारी करणाऱ्यांनी निष्ठेची भाषा बोलू नये - प्रशांत ठाकूर



कर्जत, ता. ४ : '' स्वतःच्या पक्षाशी व नेत्यांशी गद्दारी करून अवघ्या काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांनी उगाचच निष्ठेच्या गप्पा मारू नयेत,'' असा जोरदार टोला पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना लगावला. 


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 


व्यासपीठावर खासदार बारणे, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, रासपाचे भगवान ढेबे तसेच वसंतराव भोईर, तानाजी चव्हाण, प्रकाश बिनेदार, मंगेश म्हसकर, नरेश पाटील, शरद लाड, दीपक घेवरे, अश्विनी पाटील, रमेश मुंडे, रमेश रेटरेकर, विठ्ठल मोरे, रजनीताई गायकवाड, सुकन बाफना आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


आमदार ठाकूर म्हणाले, '' विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही. त्यांनी कोणतेही विकासकामे केलेली नाहीत. मतदारांना सांगण्यासारखे काही नसल्यामुळे केवळ आमच्या उमेदवाराच्या नावाने ते गद्दार, गद्दार म्हणून ओरडत आहेत. काही महिन्यांपूर्वी ते कोणत्या पक्षात होते, कोणत्या नेत्याशी त्यांनी गद्दारी केली, हे त्यांनी आधी जाहीर करावे. निष्ठेची भाषा करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही."  खासदार बारणे यांची निष्ठा हिंदुत्वाशी आहे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आहे. बारणे यांची निष्ठा देशाशी आहे, विकासाशी आहे. मावळच्या मतदारांशी आहे. त्यांनी कोणाशीही गद्दारी केलेली नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. 


खासदार बारणे म्हणाले,'' जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सर्वसामान्य माणसाच्या अन्न, पाणी, घर या मूलभूत गरजा भागवण्याबरोबरच लष्कराचे अत्याधुनिकीकरण करून देशाला संरक्षणदृष्ट्या शक्तिशाली बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.'' 



कर्जतमध्ये भाजपची ताकद निर्णायक असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले. अविनाश कोळी यांचेही यावेळी भाषण झाले. 'अब की बार, चार सौ पार', 'फिर एक बार, मोदी सरकार', 'अब की बार, बारणे खासदार' च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी विक्रमी मताधिक्याने बारणे यांच्या हॅटट्रिकचा निर्धार केला.

-------------