32.86°C Pune
Monday, May 20
image

अग्न‍ि प्रतिबंधात्मक उपाययोजना नसलेल्या चार मिळकती सिल

पिंपरी, ता. ४ :  नोटीस देऊनही ज्या मिळकतधारकांनी कोणताही प्रतिसाद न देऊन कोणतीही कार्यवाही न केलेल्या मिळकतींवर पाणी व वीज पुरवठा बंद करुन चिखली व तळवडे भागातील चार मिळकती सिलबंद करण्याची कारवाई महापालिकेने नुकतीच केली. त्यामुळे यापुढेही ज्या मालमत्ता कोणतीही कार्यवाही करणार नाहीत अशा मिळकती सिलबंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील मिळकतींच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरामध्ये औद्योगिक व व्यावसायिक मिळकतींना आग लागल्याने जीवित व वित्तहानीच्या घटना घडत असून अग्निशमन विभागाने घटना घडण्यामागील कारणांचे अवलोकन केले आहे. त्यानुसार, मनपा क्षेत्रातील बहुतांश व्यवसायिक मिळकतींमध्ये अग्न‍ि प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच व्यवसायाच्या ठिकाणीच वास्तव्य, धोकादायक पदार्थांचा साठा ई. केल्याचे दिसून आहे आहे. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये याकरीता पिंपरी चिंचवड शहरातील आद्योगिक, व्यावसायिक मिळकतींमध्ये अग्निप्रंतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण सुरु आहे. 

या सर्वेक्षणामध्ये, मनपा क्षेत्रातील व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, संस्थात्मक व वैद्यकिय इमारतींचे अग्नि प्रतिबंधात्मक सर्वेक्षण झालेल्या मिळकतीपैंकी धोकादायक मिळकतींची ओळख पटवून मिळकतीमध्ये अग्निशमन यंत्रणांची उपलब्धता, ये-जा करण्याचा सुरक्षित मार्ग, धोकादायक पदार्थांचा साठा. मिळकतीमध्ये निवासी वास्तव्य इत्यादी बाबींचा विचार करुन मिळकतधारकांना आत्तापर्यंत दोन वेळा नोटिस बजाविण्यात आल्यानंतर काहींनी त्याबाबत पूर्ततासुध्दा केली.


व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र विभागाकडे सादर करण्याची जबाबदारी इमारतीचा मालक व भोगवटादाराची...

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अधिनियमातील कलम ३(१) प्रमाणे कोणत्याही इमारीतीमध्ये किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, तसेच कलम ३(३) नुसार, लायसन्स प्राप्त एजन्सीकडील असणाऱ्या नमुन्यातील व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मनपा अग्निशामक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किेंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची असल्याचेसुध्दा विभागाने स्पष्ट केले आहे.

 


चौकट - व्यवसाय अग्निसुरक्षा पुर्तता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्या...


शहरातील सर्व औद्योगिक, वाणिज्यीक, शाळा, रुग्णालये इत्यादी व्यवसायीकांनी महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस, महाराष्ट्र शासन यांनी नियुक्त केलेले फायर लायसेंसिंग एजन्सीमार्फत त्यांच्या व्यवसायिक इमारतीमध्ये नियमानुसार आवश्यक अग्निशमन यंत्रणा बसवून घ्यावी. त्याबरोबरच मनपाच्या अग्निशामक विभागकडे अर्ज करुन व्यवसाय अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असेही विभागाकडून व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे.

-------------