36.7°C Pune
Monday, May 20
image

'' मतदानाचा हक्क बजवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे ''

पिंपरी , ता. ४ : '' शहरातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून शहरातील प्रत्येक मतदाराने लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे '', असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी (ता. ४) निगडी येथे केले.


    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे भव्य दुचाकी बाईक फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

 या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे,कार्यकारी अभियंता नितिन देशमुख,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, कार्यालय अधीक्षक रमेश डाळिंबे,नागनाथ दहिफळे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


 लोकसभा निवडणूकीसाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज शहरात भव्य दुचाकी बाईक फेरीचे आयोजन करण्यात आले होते.


भक्ती शक्ती चौक येथे जमलेल्या सर्व रायडर्सनी "आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून, निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू" अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला.


     आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीला प्रारंभ झाला. निगडी येथून निघालेली ही फेरी वाल्हेकरवाडी -थेरगाव- काळेवाडी - पिंपरी सौदागर - रहाटणी या मार्गानी रवाना होत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भवनात दाखल झाली.


    मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात सहभागी रायडर्स॔ना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते त्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून रॅलीद्वारे केलेल्या मतदान जनजागृती उपक्रमाबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


     आजच्या या फेरीसाठी ४५८ जणांनी नोंदणी केली होती, त्यातील ३१८ दुचाकीस्वार सहभागी झाले होते तसेच १२९ सह प्रवासी हातात मतदान जनजागृतीचे बॅनर्स घेऊन त्यांचेसोबत सहभागी झाले होते.


त्यामध्ये किंग्ज रॉयल रायडर्स मोटरसायकल क्लबच्या अनुप राजन, सुमित राठोड, सुभी बाबू,गौतम प्रसाद, साहिल पटेल,नितेश चिमूरकर, मोहन राऊत, अनंत पाटील, रोहन काकडे, आदींचा समावेश होता.


त्याप्रमाणे बी.यु.भंडारी एथर,राॅयल इन्फील्ड रिधान मोटर्स या शो-मरूमचे रायडर्सदेखील रॅलीत सहभागी होते. या बाईक फेरीत महापालिकेचे अग्निशामक विभागातील गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले, विजय घुगे, संजय महाडिक, अमोल रांजणे आदी सहभागी झाले होते.


     या कार्यक्रमासाठी स्मार्ट सारथीचे जस्टिन मॅथ्यु, बिनीश सुरेंद्रन, आशिष चिकणे,किरण लवटे, प्रेम मुजमुले, संकेत जोशी,सत्यम नगादे, श्रेया निपाणे, जानव्ही वडोणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंदे यांनी, सूत्रसंचालन व मतदान शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर अण्णा बोदडे यांनी पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, तसेच विविध विभागाच्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले.

-------------