32.86°C Pune
Monday, May 20
image

नेरळमध्ये शिवसेनेच्या रणरागिनीने डागली तोफ


नेरळ, ता. ४ : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी स्वतःचा पक्ष, स्वतःचा नेता सोडून दुसऱ्या पक्षात पळणारे संजोग वाघेरे हे वाघेरे नाहीत तर 'भागे रे' आहेत, या शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारावर तोफ डागली. 


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीने नेरळ येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खासदार बारणे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख डॉ. शिल्पा देशमुख, कर्जतचे संपर्कप्रमुख विजय पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर तसेच दीपक पाटील व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 


प्रा. ज्योती वाघमारे यांनी त्यांच्या भाषणात उबाठा शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांच्यावर घणाघाती टीका केली. संजोग वाघेरे यांना बारणे यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही, असे सांगून प्रा. वाघमारे म्हणाल्या, '' लोकसभा तिकिटासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात भागाभाग करणाऱ्या वाघेरे यांना तिकीट देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी होती. आपल्या पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळवणाऱ्या वाघेरे यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये.'' 



'विझलेल्यांनी मशालीला धडा शिकवा'


आपली मुलं संकटात आली की महाविकास आघाडीच्या नेत्यांना संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होतो, अशी टिप्पणी प्रा. वाघमारे यांनी केली. डॉ. आंबेडकर यांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसने केला आहे. त्याच काँग्रेसला मते द्या, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. अशा या विझलेल्या मशालीला आंबेडकरी जनतेने धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले. 


नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार ही काळा दगडावरची रेघ आहे, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. भारताला गतिमान ठेवण्यासाठी, मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मतदारांनी धनुष्यबाणाला मतदान करावे, असे आवाहन बारणे यांनी केले. 


कर्जत-खालापूरला मिळाला सर्वाधिक निधी - थोरवे


गेल्या साडेचार वर्षात कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक विकास निधी मिळाल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. खासदार बारणे यांच्या सहकार्यामुळे गेल्या साडेचार वर्षात आपल्या मतदारसंघाला केंद्र व राज्य शासनाकडून तब्बल ९०० ते १००० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 


कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार बारणे यांना एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही संतोष भोईर यांनी दिली. नेरळ व कडाव येथील कार्यकर्त्यांनी या सभेत मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. खासदार बारणे व आमदार थोरवे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

-------------