38.71°C Pune
Thursday, May 9
image

पिंपळे निलखमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांची मांदियाळी

पिंपरी, ता. १४ : पिंपळे निलख येथील गणेशनगरमधील सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकटन दिनानिमित्त गुरुवारी (ता. ११) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सचिन साठे यांनी दिली.

   स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आठवडाभर भजन सप्ताहाचे आयोजन केले होते. यानिमित्त पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी उपस्थित राहून भजन सेवा केली. तसेच बुधवारी स्वामी समर्थांच्या प्रकटन दिना पहाटे श्रींना महाअभिषेक, त्यानंतर होम हवन करण्यात आले. 

संध्याकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची परिसरातून ग्रामप्रदक्षिणा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी पिंपळे निलख पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते, विशेषतः युवक, महिलांचा समावेश उल्लेखनीय होता. ग्रामप्रदक्षिणेनंतर महाआरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आले. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच बुधवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांची रक्तदाब तपासणी, महिलांसाठी स्तनाचा कर्करोग, क्ष-किरण, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तातील सर्व घटक, कोलेस्टेरॉल, डोळे तपासणी करण्यात आली. सुमारे २५० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला, अशी माहिती सचिन साठे यांनी दिली. सचिन साठे सोशल फाउंडेशन, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि पिंपळे निलख ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

---------------------------------