38.71°C Pune
Thursday, May 9
image

वडगावला पोटोबा महाराजांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांच्या मावळातील प्रचाराचा शुभारंभ


वडगाव मावळ, ता. २३ : वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त आशीर्वाद घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी ( ता. २३) मावळ तालुक्यातील प्रचाराची सुरवात केली.


 मावळ तालुक्यापासून त्यांनी प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. त्यांच्या समवेत आमदार सुनील शेळके, भाजपचे मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, गणेश आप्पा ढोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर तसेच प्रवीण चव्हाण, सुनील चव्हाण, अविनाश चव्हाण आदी पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


मदन बाफना यांची भेट 


माजी राज्यमंत्री मदन बाफना व खासदार बारणे यांची श्री पोटोबा महाराज मंदिराच्या दारात भेट झाली. देवाच्या दारीच आपली भेट झाली, असा मिश्किल शेरा बाफना यांनी यावेळी मारला व बारणे यांना शुभेच्छा दिल्या.  


वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे तसेच सुनील चव्हाण, पंढरीनाथ ढोरे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. पाच पावली खंडोबा मंदिर तसेच विजय मारुती मंदिर येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. वडगावच्या बाजारपेठेतून प्रचार फेरी काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. ठिकठिकाणी औक्षण व सत्कार करून बारणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 


विकासासाठी सहकार्याचे ग्रामस्थांना आवाहन


कान्हे येथील श्री भैरवनाथ महाराज व श्री हनुमान जयंती उत्सवातही बारणे यांनी हजेरी लावली. ग्रामस्थांच्या वतीने किशोर सातकर, गिरीश सातकर, राजेंद्र सातकर, सतीश सातकर, बंडोबा सातकर, उत्तम सातकर, देवराम सातकर, स्वप्नील मोढवे, लक्ष्मण ठाकर आदींनी बारणे यांचे स्वागत केले. 


आमदार शेळके म्हणाले, '' गावकी-भावकीची, नात्यागोत्यांची हि निवडणूक नाही तर देश कोणाच्या हातात द्यायचा, यासाठी मतदान करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे. देशहितासाठी त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. खासदार बारणे यांना दिलेले मत हे मोदींना दिलेले मत असणार आहे.''  कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाबाबत ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.


कामशेतमध्ये प्रचार फेरी 


कामशेत बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून खासदार बारणे यांनी मतदारांना अभिवादन केले. ढोल-ताशांच्या दणदणाटात निघालेल्या या प्रचारफेरीत आमदार सुनील शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे तसेच गुलाब म्हाळसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्ला येथे दीपक हुलावळे, सचिन हुलावळे, प्रदीप हुलावळे, वाकसाई येथे माजी सरपंच मारुती येवले तसेच भरत येवले, प्रतीक देसाई, विजय देसाई यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. 


-------------------