34.98°C Pune
Thursday, May 9
image

नादुरुस्त रोहीत्र केवळ पाच तासांत बदलले

पुणे, ता. ८ :  तत्पर सेवेसाठी सज्ज महावितरणकडून देहूरोड येथे संकल्पनगरीमध्ये आगीत भस्मसात झालेले ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र केवळ पाच तासांमध्ये बदलण्यात आले. सोबतच जळालेली वीजयंत्रणा दुरुस्त करून ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा तत्परतेने सुरळीत करण्यात आला. या सुखद अनुभवामुळे संकल्पनगरीच्या वीजग्राहकांनी मंगळवारी (ता. ७) महावितरणचे सहायक अभियंता मनोज पुरोहित व सहकाऱ्यांचा सत्कार केला.

 

याबाबत माहिती अशी की, भोसरी विभागमधील देहूरोड शाखे अंतर्गत संकल्पनगरीमध्ये ३१५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्राला गेल्या बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागली. यामध्ये रोहित्रासह उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या जळाल्या तर फिडर पिलरदेखील नादुरुस्त झाले. अग्निशामक दलाच्या मदतीने ही आग सकाळी ११.३० पर्यंत विझवण्यात आली. मात्र या घटनेत ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. किमान १२ ते १८ तास वीजपुरवठा सुरळीत होणार नाही अशी स्थिती होती. वीजयंत्रणा भस्मसात झाल्यामुळे पर्यायी वीजपुरवठ्याची देखील सोय उपलब्ध नव्हती.

 

तातडीने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी दुपारी १२ च्या सुमारास सहायक अभियंता श्री. मनोज पुरोहित व सहकाऱ्यांनी वीजयंत्रणा दुरुस्तीचे आणि जळालेला रोहित्र बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अतुल देवकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. महेश देशमुख यांनी तातडीने नवीन रोहित्र, वीजवाहिन्या व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. जळालेल्या वीजवाहिन्यांसह जेसीबी क्रेनच्या सहाय्याने रोहित्र बदलण्यात आला. आगीमुळे अत्यंत कठीण परिस्थिती असताना अवघ्या पाच तासांत वीजपुरवठा सुरळीत करून संकल्पनगरीच्या ग्राहकांना महावितरणच्या सेवेचा सुखद प्रत्यय दिला. या कामगिरीची दखल घेऊन या वीजग्राहकांनी देहूरोड कार्यालयात सहायक अभियंता श्री. मनोज पुरोहित, जनमित्र नितीन भारंबे, अजय फाटे, स्वप्निल धांडे, निखिल दामदर, नीलेश नायकोडी यांचा सत्कार केला.