30.39°C Pune
Thursday, May 9
image

नव्वद टक्के आजार हे मानवी मनाशी संबंधित - डॉ. दत्ता कोहिनकर


पिंपरी, ता. २५ : अंतर्मनाने बाह्यमनाला आदेश दिला की, शरीरात रासायनिक प्रक्रिया घडून बदल घडतात, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी सकारात्मक विचारांबरोबरच नियमित व्यायाम, प्राणायाम देखील आवश्यक आहे असे मार्गदर्शन डॉ. दत्ता कोहिनकर यांनी बुधवारी ( ता. २४ ) केले.

  चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. कोहिनकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, शंकरराव देशमुख, रामदास स्वामी संस्थेचे जयंत कुलकर्णी, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, ज्योतिष तज्ञ किरण ठिपसे, गतीराम भोईर, ब्राह्मण महासंघाचे दिलीप कुलकर्णी, संतोष जंगम, रंजना जोशी, हेमा सायकर, गोंदवलेकर महाराज आरती मंडळाचे सुहास मेहता, रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कोहिनकर म्हणाले,'' नव्वद टक्के आजार हे मानवी मनाशी संबंधित असतात. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मनाला निरोगी ठेवावे. बल म्हणजे जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू.'' कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम पाटील म्हणाले विधात्याने बनवलेले क्लिष्ट यंत्र म्हणजे मानव. त्याचे मन हे आठवणींचा पाठपुरावा करणारे असते. मन हे गुणी-अवगुणी दोन्ही असते त्यातून मनाची निवड करणे मानवाच्या हातात असते. 

  प्रास्ताविकात भाऊसाहेब भोईर म्हणाले, '' ऑनलाइन आणि मोबाईलच्या जमान्यात संवाद आणि संपर्क हरवला आहे. गोंधळलेल्या मनाला नियंत्रित करण्यासाठी मनाची मशागत करणे आवश्यक आहे अशा व्याख्यानमालेतून मनाची मशागत होते. ''

  स्वागत सुहास पोफळे, प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर, सूत्रसंचालन काका गावडे आणि आभार जगदीश घुले यांनी मानले. 

-------------------------------------