28.28°C Pune
Thursday, May 9
image

‘ हयातीच्या दाखल्यांसाठी ’ महापालिकेचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण


पिंपरी, ता. १६ : मनपा हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या ‘ हयात दाखल्या ’ बाबत त्यांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून ६६९९ दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 

दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्यामध्ये बदल, दुरुस्ती करण्यासाठी कार्यालयामध्ये न येता त्यांच्या दाखल्यामध्ये मनपा प्रशासनाकडून ‘ घरोघरी ’ जाऊन नोंदणी करण्यात आली. दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्याचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली व भारतातील अग्रगण्य महानगरपालिका ठरली आहे.


असे’ झाले सर्वेक्षण…

मनपा हद्दीतील नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन त्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आली. तब्बल ६,६९९ इतक्या व्यक्तींची सर्वेक्षणाच्या माध्यमातून केवायसी पूर्ण झाली असल्याने, त्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. सर्वेक्षणामध्ये व्यक्तीच्या माहितीची नोंदणी करताना अक्षांश व रेखांश (जिओ टॅंगिग) ही घेतल्याने भविष्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना मदत पोहोचविणे सोयीचे होणार आहे. सर्वेक्षणामध्ये दिव्यांगांची केवायसी पूर्ण करताना त्यांचे फेस रीडिंग, थम्ब इम्प्रेशन, आयरिस स्कॅन व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून संकलित करण्यात आली. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना त्यांची केवायसी पूर्ण झाल्यानंतर हयातीचा दाखला देण्यात आला. सर्वेक्षणामुळे आता दिव्यांगाचा हयातीचा दाखला तत्काळ मिळण्यासाठी मदत होत आहे.


२२ टक्के दिव्यांगांना हयातीचा दाखला मिळण्यास होणार मदत...

दिव्यांगाच्या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये ६,६९९ मधील ५,२३२ जणांकडे म्हणजेच ७८ टक्के दिव्यांगांकडे यूडीआयडी सर्टिफिकेट असून १४६७ म्हणजेच २२ टक्के दिव्यांगांकडे हयातीचा दाखला नसल्याचे निदर्शनास आले; परंतु सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आता १,४६७ जणांचा हयातीचा दाखला काढण्यासाठी मदत होणार आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये दिव्यांगामध्ये ४,५४० इतके दिव्यांग पुरुष तर २१५९ इतक्या दिव्यांग महिला आहेत. याचबरोबर, सर्वेक्षणाच्या माध्यमातून वय-वर्षे २५ ते ६० यामध्ये दिव्यांगाची संख्या जास्त असल्याचे आढळले आहे. 



१,४७० दिव्यांगांना माहिती अपडेट करण्याचे विभागाचे आवाहन...

तब्बल १,४७० दिव्यांग नागरिकांचे पत्ते व माहिती अपुरी असल्याने सदर नागरिकांपर्यंत पोहोचणे अधिकाऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे येत्या काळात सदर दिव्यांग नागरिकांनी आपला पत्ता व अपुरी माहिती केवायसी सर्वेक्षणाकरिता 8459834929 या क्रमांकावर फोन करून अपडेट करावी, असे आवाहन महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून करण्यात आलेले आहे.



कोट –  आता सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिव्यांगांची इत्थंभूत व अचूक माहिती मिळाली असून आता दिव्यांगांना हयातीचा दाखला मिळणेही सोपे झाले आहे. सर्वेक्षणातून माहितीचे डिजिटलाइजेशन झाले असून दिव्यांगांना दाखल्यासाठी आता कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.

- श्रीनिवास दांगट, सहाय्यक आयुक्त, समाजविकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

-------------