30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

विद्यार्थ्यांनी नवीन गोष्टी शिकण्याला प्राधान्य द्यावे - कैलाश काटकर

पिंपरी, ता १६ : करिअरच्या संधींचे पर्याय शोधताना विद्यार्थ्यांनी केवळ कोणत्या कंपनीत आपल्याला नोकरीची संधी हवी आणि अमुक- तमुक मोठे आर्थिक पॅकेज देणाऱ्या पर्यायांना प्राधान्य देण्याऐवजी ज्या कंपन्यांमध्ये आपल्याला नवनवीन गोष्टी,अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होऊ शकते,अशा ठिकाणी नोकरीच्या संधी शोधायला हव्यात '' , असे मत क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश काटकर यांनी नुकतेच चिंचवड येथे व्यक्त केले. 


यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासाची वाटचाल कशी होत गेली हे सांगत आपण सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची आस मनात बाळगून त्यादृष्टीने प्रयत्नशील व्हायला हवे, असे सांगितले. स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ दुरुस्ती, कॅल्क्युलेटर दुरुस्ती सारख्या कामांपासून सुरुवात करून अँटीव्हायरस सोल्यूशन्स विकसित करण्यापर्यंतचा आणि पुढे क्विक हिल टेक्नॉलॉजीज या स्वतःच्या कंपनीची सुरुवात करण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. आपणा सर्वांना आयुष्यात विविध प्रकारची माणसे भेटतात ; मात्र भेटणाऱ्या प्रत्येकातून केवळ त्यांच्यातील चांगल्या गुणांना शोधून तो अंगीकारण्याची आईने दिलेली शिकवण मला खूप उपयोगी ठरली असेही काटकर यांनी सांगितले. 


यावेळी त्यांच्या हस्ते 'यशोगाथा' विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच टी शर्ट पेंटिंग स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना त्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. घरातल्या आर्थिक दुर्बलतेमुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडून करिअरला सुरुवात करून ते आज हजारो कोटींचे मूल्य असणारी जगभरातील करोडो कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्हायरसपासून संरक्षण करणारी क्विक हिल टेक्नॉलॉजीज कंपनी सुरु करण्यापर्यंतचा कैलाश काटकर यांचा प्रवास ऐकून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.


या कार्यक्रमाला 'यशस्वी' संस्थेचे संचालक राजेश नागरे, मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी, आयआयएमएसच्या एमबीए विभाग प्रमुख डॉ. वंदना मोहंती, एमसीए विभाग प्रमुख डॉ. अश्विनी ब्रम्हे यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्य्रक्रमासाठी पवन शर्मा, स्वप्नील देशमुख आदींनी विशेष सहकार्य केले.


     -----------------------