24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

तिरंग्याच्या तेजात लोणावळ्याकडे बाईकस्वारांची देशभक्तीपूर्ण धाव...

पिंपरी, ता. १५ : वंदे मातरम, भारत माता की जय... अशा देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून गेलेला परिसर, हातात तिरंगा, मनात उत्साह, आणि ओठांवर जयघोष — अशा उत्साहाच्या वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड ते लोणावळा या तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचा संदेश वेगाच्या पंखांवर वाहत नेणारी ही तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला जणू नवचैतन्य देऊन गेली.


भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘घरोघरी तिरंगा - घरोघरी स्वच्छता’ या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका व होंडा बिगविंग पीसीएमसी सेंट्रल पिंपरी शोरूम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते लोणावळा तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीला सुरुवात उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, निलेश भदाणे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आली. 


यावेळी अण्णा बोदडे म्हणाले, "राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन नक्कीच उपयुक्त ठरेल."


उपायुक्त सचिन पवार म्हणाले, ‘घरोघरी तिरंगा - घरोघरी स्वच्छता’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारे असे उपक्रम स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी उपयुक्त ठरत आहेत.' 


होंडा बिगविंग पीसीएमसी सेंट्रल पिंपरीचे सेल्स हेड विशाल गोसावी आणि क्षेत्रीय व्यवस्थापक वेंकटरमण यांच्यासह शेकडो बाईकस्वार सहभागी झाले होते. देशप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन ही रॅली जणू अभिमानाचा प्रवास ठरली.

-----------