विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या शाळा सज्ज !
पिंपरी, ता. १५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा येत्या सोमवार (ता. १६) पासून सुरु होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे शहरातील सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या अधिकारीवर्गाकडून स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप हे सन्माननीय लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासमवेत महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारीवर्गाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या एकूण प्राथमिक शाळा ११० व माध्यमिक(भागशाळा सहित) ३७ इतक्या शाळा असून येत्या सोमवार पासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा नव्या चैतन्याच्या वातावरणामध्ये फुलणार आहेत.
नवे शैक्षणिक वर्ष सुरु होताना शिक्षण विभागाकडून पुर्ण तयारी करण्यात आली असून यावर्षीही गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप आणि डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे.
कोट
नव्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम वातावरण, विविध संधी निर्माण करुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी महानगरपालिका सदैव कटिबध्द आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी - चिंचवड महानगरपालिका
.....
कोट
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिका कायम यशस्वी प्रयत्न करत आली आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये सक्षम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या प्रगतीस पाहता यंदाही त्याप्रमाणेच अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती हेच आमचे एकमेव ध्येय असेल.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
----------------
