' वसंतराव नाईक यांची शिकवण प्रेरणादायी '
पिंपरी, ता. १ : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकहितवादी निर्णय घेतले. शिक्षण, शेती, उद्योग, सहकार, सिंचन आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारी बदल घडवून आणले. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम आग्रहशील असायचे, त्यांचे समाजकार्य आणि ‘जनसेवा हाच धर्म’ ही त्यांची शिकवण अनेकांना प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सोमवारी (ता. १) पिंपरी येथे केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी, महापालिका कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, विशाल भुजबळ, नितीन समगीर, सनी कदम, विजया कांबळे, महापालिका कर्मचारी सिताराम राठोड, रमेश राठोड, रवी राठोड, बाळासाहेब राठोड, अविनाश राठोड, विजय राठोड, माया वाकडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ म्हणून ओळख होती. श्वेतक्रांती, पंचायत राज, रोजगार हमीचे जनक म्हणूनही त्यांना संबोधले जाते. भीषण दुष्काळाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक दूरगामी योजना राबविल्या. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर प्रथम महसूलमंत्री म्हणून त्यांनी पद भूषविले. महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधाऱ्याचे निर्मितीमध्ये त्यांचा महत्वपुर्ण वाटा आहे. १ जुलै हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.
--------
