सीएंसाठी उपयुक्त निधी बाबतीत सीए सदस्यांमध्ये जागृती होणे आवश्यक : सीए प्रसन्नकुमार डी
पिंपरी, ता. १० : " भविष्यात कोणावर कधी कोणते संकट ओढवेल, हे सांगता येत नाही. अशा संकटकाळात चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘सीए बेनेव्होलंट फंड’ बाबत जागरूकता निर्माण होणे अत्यावश्यक आहे. सर्व सदस्यांनी या निधीसाठी योगदान द्यावे व इतरांनाही यासाठी प्रेरित करावे," असे आवाहन आयसीएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए प्रसन्नकुमार डी यांनी केले.
निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित “व्यावसायिक घडामोडी आणि व्यवसायाचा भविष्यकाळ” या विषयावरील विशेष परिसंवादात ते बोलत होते.
या वेळी आयसीएआयचे केंद्रीय परिषदेचे सदस्यसीए चंद्रशेखर चितळे, प्रादेशिक परिषद सदस्य सीए अभिषेक धामणे, माजी प्रादेशिक परिषद सदस्य डॉ. अशोककुमार पगारिया, शाखाध्यक्ष सीए वैभव मोदी, उपाध्यक्षा सीए सारिका चोरडिया, सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए धीरज बलदोटा, कार्यकारी सदस्य सीए शैलेश बोरे व सीए सचिन ढेरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सीए प्रसन्नकुमार पुढे म्हणाले, “बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात चार्टर्ड अकाउंटंट्सनी सतत अद्ययावत राहणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, व्यावसायिक व सामाजिक बदल स्वीकारून आपले ज्ञान व कौशल्य वाढवावे. करदाते, व्यावसायिक व व्यापाऱ्यांना योग्य आर्थिक सल्ला देण्याची जबाबदारी आपली आहे. जरी सीए अभ्यासक्रम कठीण आहे, तरी या क्षेत्रातील भविष्यात संधी विपुल आहेत."
सीए चितळे यांनी बदलत्या आर्थिक आणि कायदेशीर परिस्थितीत निर्माण होणाऱ्या नव्या व्यावसायिक संधींबाबत सांगितले, '' आंतरराष्ट्रीय लेखापरीक्षण, कर सेवा, औद्योगिक सल्लागार भूमिका अशा क्षेत्रांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. '' आयसीएआय मार्फत चालविल्या जाणाऱ्या संशोधन, प्रशिक्षण व डिजिटल सक्षमीकरण उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली आणि सदस्यांनी त्यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेवटी प्रश्नोत्तर सत्र झाले. यावेळी डॉ. अशोककुमार पगारिया व सीए किशोर गुजर यांनी ‘सीए बेनेव्होलंट फंड’ साठी प्रत्येकी एक लाख रुपयाचा निधी देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाध्यक्ष सीए वैभव मोदी यांनी केले. सूत्रसंचालन सीए धीरज बलदोटा आणि आर्या जैन यांनी केले. सीए महावीर कोठारी यांनी प्रदर्शन मानले.
-------------------
