पावसाळ्यात प्रतिबंधक आजार आणि उशिरा निदान झालेल्या रुग्णांची वाढ
पिंपरी, ता. २ : पुणे शहरात पावसाळ्याचे वातावरण चांगलेच बळावले असताना डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लॅप्टोस्पायरोसिस यांसारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिंचवड येथील अदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने या पार्श्वभूमीवर अंतर्गत औषधोपचार, आपत्कालीन सेवा व बालरोग विभागांमध्ये २४ तासांची दक्षता वाढवली आहे, जेणेकरून रुग्णांना वेळीच आणि परिणामकारक उपचार मिळू शकतील.
पावसामुळे वाढलेली आर्द्रता आणि साचलेल्या पाण्यामुळे विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार पसरत असून, अनेक रुग्ण उशिरा उपचारासाठी येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे निरीक्षण आहे. रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार व आपत्कालीन सेवा विभागप्रमुख डॉ. अविनाश मुंडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, '' डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईड हे आजार वेळेत ओळखले गेले तर सहजपणे बरे होऊ शकतात. मात्र नागरिक ताप, उलटी, थकवा यांसारखी लक्षणे सुरुवातीला दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे आजार बिघडतो. पावसाळ्यातील आजार तीन प्रकारांमध्ये आहेत – व्हेक्टर-जन्य आजार (डेंग्यू, मलेरिया, लॅप्टोस्पायरोसिस), पाण्याद्वारे पसरणारे आजार (कॉलरा, टायफॉईड, अॅक्यूट गॅस्ट्रो), आणि हवा/संपर्काद्वारे पसरणारे आजार (फ्लू, न्यूमोनिया, कोविड-१९, रायनीटिस). विशेषतः कोविडच्या नव्या JN.1 व्हेरिएंटमुळे सामान्य सर्दी, खोकला, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे दिसत आहेत, जी पचनाशी संबंधित त्रासासारखी वाटतात. त्यामुळे चुकीचे निदान होण्याचा धोका वाढला आहे.
पावसामुळे रस्ते ओले, धोकादायक झाले असून अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. डॉ. मुंडे यांनी सांगितले, '' अपघात झाल्यानंतरची पहिली ६० मिनिटे – 'गोल्डन अवर' – अत्यंत महत्वाची असतात. रक्तस्त्राव किंवा मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यास ३–५ मिनिटांत गंभीर परिणाम होऊ शकतात. ''
अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राहुल बस्ते यांनी नागरिकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की बरेच आजार हे व्हायरल अथवा बॅक्टेरियल असून योग्य वेळी तपासणी आणि औषधोपचार घेतल्यास सहज बरे होऊ शकतात. पण बऱ्याच वेळा लोक स्वतःच औषधे घेऊन आजार बिघडवतात. त्यामुळे स्वच्छता राखणे, उकळलेले/फिल्टर केलेले पाणी पिणे, बाहेरचे अन्न टाळणे आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे त्यांच्यातही सर्दी, खोकला, ताप, गॅस्ट्रो, त्वचाविकार आणि डेंग्यू-मलेरिया यांची वाढ होत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ञ डॉ. प्रिया मानकरे यांनी नोंदवले. त्यांनी मुलांनी ओले कपडे लवकर बदलावेत. स्वच्छ व हवेशीर ठिकाणी खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे, डासांपासून संरक्षण करणे आणि आहारात पपई, हळदीचं दूध, सूप, डाळिंब यासारखे प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ घ्यावेत असे सुचविले. तसेच, फ्लू, टायफॉईड व हिपॅटायटिस‑A यांसारख्या लसी वेळेत देणे आवश्यक आहे.
डॉ. पार्थ दलाल, पेडियाट्रिक आयसीयू इंचार्ज, यांनी सांगितले, '' कोविड महामारीच्या काळात सर्वांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन केल्यामुळे पावसाळी आजारांमध्ये घट झाली होती. त्यामुळे असे प्रतिबंधात्मक उपाय नियमितपणे राबवले, तर रुग्णसंख्या निश्चितच कमी होऊ शकते.''
या सर्व पार्श्वभूमीवर अदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने परवडणाऱ्या दरात मोसमानुकूल तपासणी पॅकेजेस सुरू केली असून, त्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लॅप्टोस्पायरोसिस यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ० ते १६ वयोगटातील मुलांसाठी सवलतीत लसीकरण सेवा चालू आहे.
अदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक उपाय आणि संपूर्ण वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या असून, नागरिकांनी पावसाळी आजारांकडे गांभीर्याने पाहून वेळेत उपचार घेण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------
