पिंपरी चिंचवड महापालिकेने वारकऱ्यांना दिली कोविड योद्धा महिला बचत गटातर्फे बनवलेल्या शबनम बॅगची भेट
पिंपरी, २४ : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येतो. परंतु यावर्षीचा सन्मान फक्त वारकऱ्यांपूरता मर्यादित राहीला नाही, तर तो संघर्षातून उभ्या राहिलेल्या महिलांच्या निःस्वार्थ भक्तीचा देखील सन्मान ठरला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये १९ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या तर २० जून रोजी संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी महापालिकेच्या वतीने या दोन्ही पालख्यांचे स्वागत करताना वारकऱ्यांचा सन्मान कोविड योद्धा महिला बचत गटातर्फे बनवलेल्या शबनम बॅग (कापडी पिशवी मांजरपाट) देऊन करण्यात आला. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…’ असा गजर करीत पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या खांद्यावर दिसणारी ही शबनम बॅग स्वतःचं दु:ख विसरून श्रद्धेने सेवेसाठी उभे राहण्याचा एकप्रकारे संदेशच देत होती.
उमेद जागर उपक्रमांतर्गत दिले प्रशिक्षण
कोरोना महामारीमध्ये विधवा झालेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद जागर उपक्रमांतर्गत महापालिकेने थेरगाव येथे शिलाई केंद्र सुरू केले आहे. या शिलाई केंद्रात महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या केंद्रातच बचत मागील दोन वर्षांपासून महिला वारकऱ्यांना वाटण्यासाठी कापडी पिशव्या बनवत आहेत. या वर्षी वारकऱ्यांना वाटण्यासाठी तब्बल २ हजार शबनम बॅग महिलांनी तयार केल्या होत्या. महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी झाली. सहाय्यक समाजविकास अधिकारी संतोषी चौरगे, समुह संघटक वैशाली खरात, विशाल शेडगे, संगीता इंद्राक्षे, रेश्मा पाटील, अनिकेत सातपुते, प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव शिलाई केंद्रातील स्मिता अंकुशे, मंगल लोंढे, सीमा चौधरी, सविता शिंदे, सत्यभामा उदमले, मीना चौधरी, कविता साबळे, हिरा कांबळे, राणी शेट्टी, सारिका सूर्यवंशी, मंगल कांबळे यांनी या शबनम बॅगचे शिवणकाम केले.
……
कोट
महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. उमेद जागर उपक्रमांतर्गत कोविड योद्धा बचत गटातील महिलांना याद्वारे व्यवसायाची संधी मिळाली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. वारकऱ्यांना वाटण्यासाठी त्यांनी शबनम बॅग तयार केल्यामुळे या महिलांनी भक्तीचा एक वेगळाच अर्थ स्वत:च्या कृतीतून मांडला आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
......
कोट
कोविड योद्धा बचत गटातील महिलांना उमेद जागर उपक्रमांतर्गत व्यवसायाची संधी उपलब्ध करून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या बचत गटातील महिलांनी तयार केलेली शबनम बॅग वारकऱ्यांना वितरीत केल्यामुळे एकप्रकारे हा बचत गटातील महिलांच्या कामाचा सन्मान ठरला आहे.
- ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग
.....
कोट
आम्हाला शिलाई प्रशिक्षण देऊन शिलाई युनिट उभे करून दिले आहे. आर्थिक सक्षम होण्यास यामुळे मदत झाली असून आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही तयार केलेल्या शबनम बॅग देऊन वारकऱ्यांचा सन्मान केल्याचा खूप आनंद आहे.
- मंगल लोंढे, बचत गट सदस्य
..
कोट
महापालिका प्रशासनाने आम्हाला वारकऱ्यांसाठी शबनम बॅग शिवुन देण्याची ऑर्डर देऊन भाविकांच्या रूपात विठुरायाची सेवा करण्याची संधी दिली. यामुळे सामाजिक बाधिलकी जपता आली आहे.
- सविता शिंदे
-----------------------------