पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सिंबायोसिस संस्थेच्या उपक्रमाने शेकडो तरुणी होताहेत आत्मनिर्भर
पिंपरी, ता. १८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ किवळे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तरुणींसाठी एक महत्त्वाकांक्षी कौशल्यविकास उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पात्र तरुणींना दोन प्रकारचे मोफत निवासी डिप्लोमा कोर्सेस करण्याची संधी दिली जात असून यामुळे विद्यार्थिनींचे आयुष्य बदलू लागले आहे. हा कोर्स केल्यानंतर तरुणींना मॅन्युफॅक्चरिंग व वाहन उद्योगांमध्ये केवळ रोजगाराची संधीच मिळत नाही, तर त्या आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभा राहत असून हा उपक्रम एकप्रकारे त्यांचे भविष्यच उज्ज्वल करणारा ठरत आहे.
कौशल्यविकास उपक्रमांतर्गत ‘डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ हा दहावी नंतर तर ‘डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन’ हा बारावी नंतरचा डिप्लोमा कोर्स चालवला जातो. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम ग्रुप) असणाऱ्या विद्यार्थिंनीना बारावी नंतरच्या डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेतला येतो. यामध्ये मोफत प्रशिक्षणासोबतच मोफत वसतिगृह, भोजन, गणवेश आणि सुरक्षात्मक साहित्यही दिले जाते.
विद्यार्थिंनी निवडीची प्रक्रिया
विद्यार्थिंनीची प्रवेशासाठी निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे गुणवत्ता निकषांवर केली जाते. प्रवेश अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे जर्मन द्वैतीय प्रशिक्षण पद्धतीचा प्रमाणे हे प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव याला प्राधान्य दिले जाते. बहुतेक विद्यार्थिनी प्रत्यक्ष प्रयोगशाळा व फील्ड प्रशिक्षणात अधिक वेळ घालवतात. मागील शैक्षणिक वर्षात हा कोर्स केलेल्या विद्यार्थिंनी पिंपरी चिंचवड तसेच चाकण परसिरातील कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करत असून काहींना कायम नोकऱ्याही मिळाल्या आहेत.
प्रवेशासाठी अर्ज कसा कराल?
• इच्छुक उमेदवारांनी https://forms.office.com/r/guCYPQguJK या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा
• प्रवेश अर्जासाटी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाशी किंवा सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ किवळे येथे संपर्क करता येईल.
• निवड ही दहावी / बारावीच्या निकालानंतर होणाऱ्या लेखी परीक्षा व मुलाखतीवर आधारित असेल
• वयोगट : दहावी – १६ ते १९ वर्षे, बारावी – १८ ते २० वर्षे असलेल्या विद्यार्थिनी अर्ज करू शकतात.
• अर्ज करण्यासाठी ३१ जुलै २०२५ ही शेवटची मुदत आहे.
• अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: 7219193023 / 7823893866 / 7498225237
दोन वर्षात शंभर पेक्षा जास्त तरुणींना देण्यात आले प्रशिक्षण
कौशल्यविकास उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ‘डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ या कोर्सला ४८ तर ‘डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन’ कोर्सला ३ अशा एकूण ५१ विद्यार्थिंनींना प्रशिक्षण देण्यात आले. तर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ या कोर्सला ३८ तर ‘डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन’ कोर्सला १४ अशा एकूण ५२ विद्यार्थिंनींना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ऑटोकॉम्प आणि फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. अशा कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही विद्यार्थिंनींना देण्यात आली. आता २०२५ च्या बॅचसाठी डिप्लोमा इन अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स या नवीन तीन वर्षांच्या कोर्ससाठी ६० मुलींची निवड करणार आहे. या कोर्सनंतर थेट दुसऱ्या वर्षाला बी-टेक मध्ये प्रवेशाची संधी मिळू शकेल
.........
कोट
आर्थिक अडचणीमुळे दहावी, बारावीनंतर उच्च शिक्षण घेऊ न शिकणाऱ्या विद्यार्थिंनीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका सिंबायोसिस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवत असलेला उपक्रम पर्वणी ठरत आहे. या उपक्रमांतर्गत डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थिंनींना रोजगाराची संधी मिळत असून त्या आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
- ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
.......
कोट
एक सक्षम मुलगी संपूर्ण समाजाला सक्षम करू शकते, असा आमचा विश्वास आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवडमधील मुलींना पूर्णपणे मोफत डिप्लोमा प्रशिक्षण देऊ शकलो. यामुळे उत्पादन व ऑटोमोटिव्ह क्षेत्रात प्रशिक्षित महिला कर्मचारी मिळत आहेत.
- डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू, सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ
........
कोट
आर्थिक अडचणींमुळे माझे शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होते. सिंबायोसिस संस्थेच्या संकेतस्थळावर मला डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स या कोर्सची माहिती मिळाली. हा कोर्स मोफत असल्यामुळे माझ्या वडिलांवर आर्थिक भार न टाकता मी शिक्षण सुरू ठेवू शकले. कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला असून करिअरचा मार्ग सापडला आहे. मला खात्री आहे की मी लवकरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल.
- दिव्या डुकरे, विद्यार्थिनी
.......
कोट
सिंबायोसिस संस्थेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने चालवण्यात येणारा डिप्लोमा कोर्स हा फक्त हा कोर्स फक्त तांत्रिक कौशल्य शिकवणारा नाही, तर आत्मविश्वासही वाढवणारा आहे. यामुळे पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातही मी चांगली कामगिरी करू शकते. हा कोर्स केवळ नोकरीसाठी नाही, तर विचारसरणीत बदल घडवणारा आहे.
- श्रुती मदने, विद्यार्थिनी
......