24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे ताबडतोब भूमिपूजन करा - प्रमोद क्षीरसागर

पिंपरी, ता. २ : '' पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या मागील जागेत मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांचे यथोचित स्मारक लवकरात लवकर उभारावे, तसेच यासाठीचा आवश्यक ३५ कोटीचा रुपयांचा निधी जाहीर करून या स्मारकाचे भूमिपूजन करावे '', अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मातोश्री रमाई आंबेडकर स्मारक निर्माण समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर व समन्वयक राहुल डंबाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.   

 


यासंदर्भातील पत्र संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी महेंद्र सरवदे, राहुल सोनवणे, बुद्धभूषण अहिरे, गौतम पटेकर, प्रशांत नाटेकर, मंथन गायकवाड, सिद्धार्थ मोरे, विशाल मांजरे, पंकज भेंडे, अक्षय करंडे, सन्मुख हदीमणी, सचिन उदागे, बसवराज नाटेकर, शुभम शिंदे, सुलतान तांबोळी, रमेश शिंदे, राहुल बनसोडे आदी उपस्थित होते.

  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रास्तावित विकास आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यामध्ये नियोजित मातोश्री रमाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या जागेवर दुसरे आरक्षण दाखविण्यात आले आहे. यामुळे आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये मनपा प्रशासनाविषयी तीव्र रोष निर्माण झाला आहे. या ठिकाणी रमाईंचे यथोचित स्मारक यामध्ये पूर्णा कृती पुतळा, शिल्पसृष्टी, उद्यान विकसित करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंबेडकरी चळवळीतील जनतेला यापूर्वी आश्वासन दिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांसमवेत या जागेची स्थळ पाहणीहि केली आहे. परंतु आता या जागेवर दुसरेच आरक्षण दाखवल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, हा संभ्रम दूर करण्यासाठी या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन ताबडतोब करावे, अशी मागणी स्मारक निर्माण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या प्रस्तावित विकास आराखड्यास शेकडो हरकती घेण्यात आल्या आहेत. या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. ७ ) महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीमध्ये विधानभवनाला घेराव घालून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

-----------------------------------------