25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महावितरणचा लकी डिजिटल पहिला ड्रॉ जाहीर ; २३० वीजग्राहकांना मिळणार स्मार्ट फोन, स्मार्टवॉच

पुणे, ता. २६ : सलग तीन किंवा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरु केली आहे. यात पहिल्या ड्रॉमध्ये पुणे परिमंडलातील २३० वीजग्राहकांना बक्षिसे जाहीर झाली आहे. गुरुवारी (ता. २५) मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ वीजग्राहकांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच बक्षिसांचे वितरण करण्यात आले.


‘लकी डिजिटल ग्राहक योजने’त प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे असून एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. प्रत्येक उपविभागासाठी प्रथम – एक स्मार्ट फोन, द्वितीय - दोन स्मार्ट फोन आणि तृतीय बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ अशी प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे परिमंडलातील ४६ उपविभागांसाठी एकूण २३० बक्षिसांसाठी पहिला लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने ७ एप्रिलला काढण्यात आला. या योजनेतील प्रातिनिधिक विजेते अनिल माने, मारूती मगर, छगनलाल सोळंकी, विद्या देशपांडे, एनरीच एनर्जी लिमिटेड यांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच बक्षिसांचे वितरण करण्यात आले. उर्वरित विजेत्यांना विभाग व उपविभागस्तरावर बक्षिस वितरीत करण्यात येत आहे.


ग्राहकांना येत्या दि. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची १० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.

या योजनेत यापुढे मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाईटवर जाहीर होईल. तसेच संबंधित विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बक्षिस जिंकल्याची माहिती देण्यात येईल. किंवा विजेते ग्राहक देखील तीन दिवसांच्या आत जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट अधिक माहिती उपलब्ध आहे.


------------------