24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा साधनांसाठी ‘ऑनलाइन मॉड्यूल’चे उद्घाटन

मुंबई,ता. १९ : वीज यंत्रणेत सुरक्षितपणे देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना महावितरणकडून २० ते २५ प्रकारचे वैयक्तिक व कॉमन सुरक्षा साधने देण्यात येतात. ही सुरक्षा साधने आवश्यकतेनुसार व मागणीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र ‘टी अॅण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’चे उद्घाटन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते नाशिक येथे बुधवारी (ता. १८) झाले  वीज यंत्रणेत काम करताना कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा व सुरक्षिततेची पूर्ण खात्री करूनच देखभाल व दुरूस्तीचे कामे करावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 



महावितरणच्या एम्प्लॉई पोर्टलवरील या स्वतंत्र मॉड्यूलमुळे सुरक्षेचे सर्व साधने व साहित्य तसेच चाचणी उपकरणांची उपलब्धता, वितरण, मागणी, पुरवठा व प्राप्तीची नोंद आदींचा लेखाजोगा ऑनलाइन उपलब्ध राहणार आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते हे मॉड्यूल कार्यान्वित करण्यात आले. यावेळी कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन), राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) अरविंद भादिकर यांची उपस्थिती होती.


महावितरणचे ग्रामीण, शहरी शाखा कार्यालये, वीज उपकेंद्र, चाचणी विभाग, भरारी पथक, फिल्टर युनिट आदी कार्यालयातील तांत्रिक कर्मचाऱ्यांना टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, रबर हातमोजे, गमबूट, रेनकोट, सेफ्टी बेल्ट, झुला, शूज आदी वैयक्तिक तसेच शिडी, एचटी व एलटीचे फोल्डेबल डिस्चार्ज रॉड, बॉक्स स्पॅनर, टॉर्च, मेगर, ड्रील मशीन आदी कॉमन सुरक्षा साधने आणि चाचणीसाठी काही उपकरणे देण्यात येतात. आतापर्यंत या साहित्यांची लेखी मागणी नोंदविणे, त्यास मंजूरी मिळणे, मंडल कार्यालयाकडून ते उपलब्ध होणे व वितरीत होणे ही पारंपरिक प्रक्रिया सुरू होती.


तथापि, तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने आवश्यकता व मागणीनुसार तात्काळ उपलब्ध व्हावीत यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया स्वतंत्र मॉड्यूलद्वारे ऑनलाइन करण्याची सूचना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केली होती. त्यानुसार प्रशिक्षण व सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने संयुक्तपणे या मॉड्यूलची निर्मिती केली आहे. या मॉड्यूलद्वारे आता केवळ एका क्लिकद्वारे तांत्रिक कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधनांची मागणी करता येणार आहे. सोबतच कर्मचाऱ्यांकडे व प्रत्येक मंडलस्तरावर उपलब्ध असलेल्या सर्व सुरक्षा साधनांचा लेखाजोगा या मॉड्यूलवर उपलब्ध राहणार आहे.


ऑनलाइन ‘टी अॅण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’मुळे सुरक्षा साधनांचे वितरण पारदर्शक तसेच तत्परतेने होणार आहे. तसेच वेळीच खरेदी प्रक्रिया करून आवश्यक सुरक्षा साधने भांडारात उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करता येईल. प्रत्येक साहित्याला गुणवत्तेसाठी वापरण्याची स्वतंत्र मुदत आहे. मुदतीनंतर ते बदलण्यात येते किंवा त्याआधीच खराब झाल्यास त्याची देखील नव्याने मागणी या मॉड्यूलद्वारे केवळ एका क्लिकवर नोंदविण्याची सोय कर्मचाऱ्यांना झाली आहे.

---------------------------