23.41°C Pune
Monday, March 16
Breaking News:
image

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी "कोडिंग समर कॅम्प" उत्साहात

पिंपरी, ता. ६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘ लीडरशिप फॉर इक्विटी ’ (एलएफई) संस्थेच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित महिनाभराच्या ‘कोडिंग समर कॅम्प’चा समारोप गुरुवारी (ता. ५) उत्साहात झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ८० शाळकरी विद्यार्थ्यांना कोडिंग, तर्कशक्ती आणि सर्जनशीलतेच्या जोरावर समस्येचे निराकरण या महत्त्वाच्या कौशल्यांमध्ये सक्षम करण्यात आले.


पाच आठवड्यांच्या आणि एकूण ४५ तासांच्या या सत्रात इयत्ता ३ री ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'स्क्रॅच' या ब्लॉक आधारित कोडिंग प्लॅटफॉर्मद्वारे कोडिंगचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. यामध्ये गेम्स आणि स्टोरी डिझाईन तसेच सर्किट्स, एलईडी आणि सेन्सर्स यांद्वारे फिजिकल कम्प्युटिंगचा अनुभवही विद्यार्थ्यांना मिळाला.


चिंचवड येथील ऑटो क्लस्टरजवळील सायन्स पार्कमध्ये दर आठवड्याला हे शिबिर तीन दिवस आयोजित करण्यात आले. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला होता, तर खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले होते.


या शिबिराच्या समारोपप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या रंगतदार हॅकाथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या गोष्टींद्वारे इंटरअॅक्टिव्ह गेम्स, डिजिटल स्टोरीज आणि हार्डवेअर प्रोटोटाईप्स सादर केले. यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले," हे शिबिर केवळ कोडिंग शिकवण्यासाठी नव्हते, तर मुलांच्या भविष्यासाठी विविध संधींची नवीन दारे उघडण्यासाठी होते. संगणकीय विचारशक्ती आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज असलेल्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासी, जिज्ञासू आणि सर्जनशील नागरिक बनवण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रमांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. '' 


या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. अनेक पालकांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबीर नियमितपणे शहरात विविध ठिकाणी आयोजित करावेत, अशी मागणी केली.


विद्यार्थ्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया -


आमच्या मुलांचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. मोबाईल म्हणजे केवळ टाईमपास किंवा गेम खेळण्यासाठी वापरली जाणार गोष्ट नाही, तर कोडिंगसारखी गोष्टसुद्धा त्यातून शिकता येते. शिवाय ती कठीण नाही तर मजेशीर आहे हे मुलांना आता कळू लागलं आहे. 

- देवता कांबळे, एक पालक

---------