महानगरपालिका व मनुश्री योग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या संकल्पनेवर वृक्ष लागवड करत योग साधना
पिंपरी, ता. २१ : जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मनुश्री योग यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे योग साधना करण्यात आली. यंदाच्या केंद्र सरकारच्या ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित योग साधना करतांना उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून योग सत्राला सुरवात करण्यात आली.
यावेळी माजी नगर सदस्य गोपाल मळेकर, उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, मनुश्री योगच्या योगाचार्य नूतन जोंधळे, मच्छिंद्र रोडे, कृष्णा आंधळे, मंगेश जोंधळे, डॉ. अशोक ठाकरे, मिया बाय तनिष्क च्या व्यवस्थापक रचना वर्मा, उद्यान सहाय्यक हनुमंत चाकणकर तसेच मनुश्री योग परिवार, धर्मवीर गार्डन ग्रुप व नागरिक उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग आणि रहाटणी येथील मनुश्री योग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त योग सत्रास उपस्थित नागरिकांना ‘ एक पृथ्वी एक आरोग्य ’ या संकल्पनेवर आधारित योग शिकवण्यात आले. यामध्ये २ वर्षाच्या बालकापासून ८० वर्षांच्या आजोबापर्यंत चे नागरिक सहभागी झाले होते. योगाचार्य नूतन जोंधळे व मच्छिंद्र रोडे यांनी प्रत्येकाला करता येथील असे साधे आणि सोपे योग प्रकार शिकवले. यामध्ये ताडासन, कपालभाती, निद्रासन, यासारख्या सोप्या योगांचा देखील समावेश होता. तर डॉ. अशोक पवार यांनी उपस्थिताना हसण्याचे विविध प्रकार शिकवले.
आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याच्या वातावरणात जागतिक योग दिनानिमित्त योग सत्रात प्रत्येक सहभागी नागरिकांना उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून सर्वाधिक ऑक्सिजन देणारे तुळशीचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. तसेच योग दिनानिमित्त मिया बाय तनिष्क च्या वतीने सर्वांना पौष्ठिक आहार व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या पिंपरी चिंचवड शहरातील दीड लाख झाडांच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत या योग कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये उप आयुक्त अण्णा बोदडे व सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या हस्ते विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कोट
योग साधना ही प्राचीन भारतीय कला आहे. रोजच्या जीवनात रोज सकाळी १ तास आपण योग साधना रोज केल्याने आरोग्य सुदृढ राहील. आपल्या परिसरातील महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये रोज जाऊन निसर्गाच्या सानिध्यात योग करून आरोग्य संपन्न शरीर कमवा.
-उमेश ढाकणे , सहाय्यक आयुक्त, उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
—---------
