30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

महानगरपालिका शाळांमधील प्रारंभिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ

पिंपरी,ता. ३१ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता झपाट्याने सुधारत आहे. २०२३–२४ या शैक्षणिक वर्षात २८ टक्के विद्यार्थी शिकण्याच्या प्रारंभिक (बिगिनर) पातळीवर होते, तर २०२४–२५ मध्ये ही टक्केवारी केवळ १३ टक्क्यांवर आली आहे. याशिवाय प्रगत (अँडव्हान्स) पातळीवरील विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली असून त्यांची टक्केवारी ०.५ टक्क्यांवरून थेट ६ टक्क्यापर्यंत वाढली आहे. 


या बदलामागे 'भारतीय गुणवत्ता परिषदे'ने (QCI) तयार केलेल्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीचा मोठा वाटा आहे. हे मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी करण्यात आले ज्यात इयत्ता १ ते १० मधील ४८ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. गणित, भाषा, विज्ञान व पर्यावरण या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये संकलित केलेल्या माहितीच्या आधारे कृती आणि वर्गातील बदलांचा परिणाम दिसून आला. 


चौकट- 'सक्षम' उपक्रमामुळे भाषा आणि गणित कौशल्यांमध्ये लक्षणीय सुधारणा

QCI मूल्यमापनासोबतच, ‘सक्षम’ हा उपक्रमही शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. इयत्ता ३ ते ८ मधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून, आतापर्यंत ३० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. यामध्ये वाचन, लेखन आणि गणित विषयात सुधारणा दिसून येत आहे. या उपक्रमाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनीही याचे कौतुक केले आहे.


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि निपुण भारत अभियानांतर्गत ‘सक्षम’ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शाळेच्या पहिल्या दोन तासांमध्ये भाषा व गणित शिकवणाऱ्या सत्रांना प्राधान्य देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात ही वेळ ४० मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये विभागण्यात आली आहे, जेणेकरून सर्व विषयांना समतोल वेळ देता येईल.


शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी खास प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. तसेच पालकांचाही सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे.


चौकट - विश्लेषणावर आधारित शिक्षण पद्धतीचा प्रभाव

QCI मूल्यमापन पद्धती आणि सक्षम उपक्रमामुळे पीसीएमसी शाळांमध्ये शिकवण्याची पद्धत अधिक संरचित, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण बनली आहे. या दोन्ही पद्धती पुढील शैक्षणिक वर्षातही सुरू ठेवण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक गुणवत्ता पोहोचवण्याचा निर्धार यामागे आहे.


चौकट - शैक्षणिक मूल्यमापनातील ठळक बाबी:

१) इयत्ता पहिली ते दहावीतील ४८ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन


२) प्रारंभिक (बिगिनर) पातळीवरील विद्यार्थी – २८% वरून १३% वर


३) प्रगत (अँडव्हान्स) पातळीवरील विद्यार्थी – ०.५% वरून ६% पर्यंत


४) इयत्ता दुसरी:

प्रारंभिक (बिगिनर) स्तर – ३०% वरून ७%

प्रगत (अँडव्हान्स) विद्यार्थी – ०% वरून २५% 


५) इयत्ता पहिली:

प्रारंभिक (बिगिनर) स्तर – ५०% वरून १८%

प्रगत (अँडव्हान्स) विद्यार्थी – ०% वरून ८%


६) इयत्ता पाचवी:

प्रारंभिक (बिगिनर) स्तर – ५४% वरून १४%


७) सर्व शिक्षकांना कौशल्याधिष्ठित अध्यापनाचे प्रशिक्षण


८) सक्षम उपक्रमांतर्गत ३० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ


९) शाळेच्या पहिल्या दोन तासांमध्ये भाषा आणि गणित यावर विशेष भर (प्रथम टप्पा)


१०) ४५ मिनिटांची संरचित शिकवणी पद्धत (द्वितीय टप्पा)


११) वाचन, लेखन व गणित कौशल्यात सर्व शाळांमध्ये लक्षणीय सुधारणा


कोट 

भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचे मूल्यमापन करता आले. या माहितीच्या आधारावर वर्गपातळीवर थेट कृती करता आली आणि सकारात्मक शैक्षणिक सुधारणा साधता आली. ही सुधारणा केवळ सुरुवात असून महापालिका प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वर्गानुसार आवश्यक शैक्षणिक कौशल्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


कोट 

नियमित मूल्यमापन, शिक्षकांचे विषयानुसार मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या माहितीवर आधारित तांत्रिक सहाय्य हे या प्रगतीचे मुख्य आधारस्तंभ ठरले. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत मागे असलेल्या शाळांनीही आता लक्षणीय सुधारणा केली आहे. विश्लेषणाधारित आणि शाळा व विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.

- विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

-----------------