26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

'डीबीटी'च्या माध्यमातून एका महिन्यात ४० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ !

पिंपरी, ता. १६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासाठी सुधारित थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी उपक्रम सुरू केला आहे. महानगरपालिकेच्या १४६ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा थेट लाभ मिळावा, या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत तब्बल ४० हजार ८६१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या किटचे वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा पार झाला असून उर्वरीत विद्यार्थ्यांनाही ३१ जुलै २०२५ पर्यंत शालेय साहित्याचे किट देण्याच्या दृष्टिने नियोजन करण्यात आले आहे. 


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळा १६ जून २०२५ रोजी उत्साहात सुरू झाल्या. त्यानंतर एका महिन्यातच शिक्षण विभागाने सुधारित थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) उपक्रमांतर्गत ई-रुपी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुरक्षित, रोखविरहित व्यवहार करून ४० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य किट पुरविले आहे. या किटमध्ये नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक १२ वस्तूंचा समावेश आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया राबविल्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता व गतिमानता दिसून आली. 


अशी आहे ई-रुपी प्रक्रिया


- ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर असून यासाठी बँक खाते आवश्यक नाही

- यामध्ये लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे प्री-पेड क्युआर कोड व्हाउचर प्राप्त होते

- हे व्हाउचर केवळ शाळा साहित्य खरेदीसाठीच वापरता येते. 

- यासाठी फक्त १० अंकी वैध संपर्क क्रमांक आवश्यक

- अतिरिक्त सुरक्षेसाठी ओटीपीद्वारे व्यवहार पडताळणी

-   १६ जुलैपर्यंत या प्रक्रियेद्वारे ४० हजार ८३१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ 

-   आतापर्यंत वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्याची किंमत सुमारे १५ कोटी ५६ लाख ७० हजार रुपये

कोट 


डिजिटल ई-रुपी पेमेंट प्रक्रियेद्वारे आम्ही एका महिन्यात ४० हजार ८६१ विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहचवले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. 

– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

……