चिंचवडला गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस प्रतिसाद
पिंपरी, ता. १ : संस्कार भारती पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने गणेशउत्सवानिमित्त रविवारी (ता.१ ) सकाळी ९ ते ११ या वेळेत लाल मातीपासून स्वहस्ते पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
संस्कार भारती, दृश्य -कलाविधाविभागातर्फे येथील पडवळ आळी चिंचवडे अभ्यासिका, चिंचवडगांव येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध वयोगटातील ५५ जणांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती बनवण्याची संकल्पना प्रफुल्ल विष्णूरकर यांनी मांडली. लहानपणापासूनच मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे. पीओपीसारख्या घातक माध्यमाच्या दुष्परिणामांची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. आपण पर्यावरणाचे रक्षण कसे केले पाहिजे, याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते.
अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार रमा घारे, रती देशमुख, शोभा पवार, धीरज दीक्षित यांनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक दाखवले त्या नुसार सहभागी विद्यार्थ्यांनी आपापली गणेशमूर्ती तयार केली. लीना आढाव यांनी पर्यावरणपूरक आणि १०० % नैसर्गिक लाल माती, शाडू माती आणि पीओपी यातील फरक स्पष्ट केला.
याप्रसंगी रुपकांत जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. या पद्धतीच्या आणखी कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड येथे घेण्यात याव्यात, अशी मागणी सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली. त्यानुसार दिवाळीत घरच्या घरी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा संस्कारभारती तर्फे घेण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
--------
