26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

भूगाव, पिरंगुट वीजपुरवठा पूर्ववत ; वीजवाहिनी तुटून खंडित झाला होता वीजपुरवठा

पुणे, ता. १६ : पिरंगूट येथील बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने तुटलेल्या वीज वाहिनीमुळे भूगाव, पिरंगूटसह परिसराचा वीजपुरवठा रविवारी दुपारी २ च्या सुमारास बंद झाला होता. महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर २४ तासाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. 


पिरंगूट येथे एमएसआरडीसीच्या पुलाचे काम सुरु आहे. त्यासाठी संबंधित विभागाने भराव टाकून काम सुरु केले होते. रविवारी दुपारी पावसाच्या पाण्यामुळे टाकलेला भराव वाहून गेला. त्यामुळे २२ केव्ही स्कायआय वीज वाहिनी चार ठिकाणी तुटली. परिणामी साधारणत: २० हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरवातीला बंद झाला. रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरच होते. परंतु संततधार पाऊस व वाहत्या पाण्यामुळे कामे करताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे काम थांबवून सकाळी पाणी कमी होताच पुन्हा कामाला सुरुवात झाली.


सोमवारी सकाळी अंशत: ग्राहकांचा शक्य आहे त्या पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु केला. मात्र त्यातही अनेकदा व्यत्यय आला. सकाळी ११ वाजता गणेशखिंडमार्गे भूगावचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे ८ हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला. सोमवारी दुपारी ३ नंतर चारही जॉईंट जोडून सर्व स्कायआय वाहिनीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे.


वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुळशी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले, शाखा अभियंते दाम्पलवार, नितीन धस व मनोज काळे यांचेसह भूगाव, भूकुम आणि खातपेवाडी येथील वीज कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली.


 -----------