यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांचा गौरव
पिंपरी, ता. २१ : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री - १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत तिसरे स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगळवारी (ता.२०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा गौरव केला.
मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री - १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा अंतिम निकाल १६ मे रोजी जाहीर झाला. यात गुणवत्ता परिषद भारत (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया QCI) यांनी केलेल्या अंतिम मूल्यांकनात पीएमआरडीएने ७६.०२ गुण मिळवत राज्यभरातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय / निमशासकीय संस्था, कंपन्या आदी गटातून तिसरा क्रमांक मिळवला.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएने सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवत कार्यालयात अपेक्षित सोयी सुविधांसह प्रशासकीय कामकाजातील गतीमानतेला अधिक प्राधान्य दिले. यात प्रशासकीय कामकाजातील नाविन्यता, लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, अद्ययावत संकेतस्थळ, कार्यालयीन स्वच्छता व सोयी सुविधा अशा काही महत्वांच्या मुद्द्यांची राज्य सरकारने दखल घेतली. दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री - १०० दिवस या कार्यक्रमातील कामगिरीची नोंद घेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा आज गौरव करण्यात आला.
कोट
मुख्यमंत्री - १०० दिवसाच्या कार्यक्रमात माझ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सामूहिक मेहनतीमुळे पीएमआरडीएलाहा पुरस्कार मिळाला. नागरिक केंद्रीत कार्यालयीन सोयी-सुविधा आणि लोकाभिमुख प्रशासनावर अधिक भर आहे. राज्य सरकारने दखल घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
- डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
--------------
