वैद्यकीय क्षेत्राचा डॉ.सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा
आकुर्डी, ता. १७ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना स्थानिक डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा उमेदवाराच्या लोकहितैषी दृष्टीकोन, आरोग्यविषयक धोरणांवरील ठाम भूमिका आणि वैद्यकीय क्षेत्रातील गरजा ओळखण्याच्या क्षमतेवर दिला आहे.
डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आपल्या प्रचारादरम्यान वैद्यकीय सुविधा सुधारणा, मतदार संघातील आरोग्य सेवा बळकटीकरण आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अनुकूल कामकाजाची स्थिती निर्माण करण्याची हमी दिली आहे. त्यांच्या या वचनबद्धतेला प्रतिसाद म्हणून, स्थानिक डॉक्टरांनी त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला.
डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांना गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल, असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत, असे यांनी सांगितले.
डॉ.सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या, '' मी डॉक्टरांच्या या पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहे. हा पाठिंबा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मी वैद्यकीय क्षेत्राला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असा विश्वास दिला.''
या पाठिंब्याची औपचारिक घोषणा आकुर्डी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात करण्यात आली. यामध्ये डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यासोबत अनेक प्रतिष्ठित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डॉ. सुनील जगताप डॉक्टर सेल प्रदेश प्रमुख,डॉ. दत्तात्रय कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,उपसंचालक पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन, निमा पिंपरी चिंचवड माजी अध्यक्ष,डॉ. किशोर खिलारे अध्यक्ष जनआरोग्य मंच पुणे जिल्हा, डॉ.भरत सरोदे,डॉ. अभय तांबिले पिंपरी चिंचवड सेल राष्ट्रवादी शहर अध्यक्ष, आणि शहरातील प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
------