24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, ता. ८ : '' वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करून राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा दाखविण्याचे काम करीत आहे. त्यातूनच समाज घडत आहे, '' अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  आळंदी येथे फ्रुटवाले धर्मशाळा येथे झालेल्या ह.भ.प मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या व ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प. कुरेकर महाराज यांना " शांतीब्रह्म " पुरस्कार आणि ह.भ.प. ढोक महाराज यांना "तुलसीदास" पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संतपूजन करण्यात आले.

 यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर), ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त हभप संजय महाराज पाचपोर आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, '' संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे. हभप मारोती महाराज कुरेकर, हभप रामराव महाराज ढोक आणि वारकरी संस्थेचे योगदान मोठे आहे. शिकवणाऱ्याला मानधन नाही आणि शिकणाऱ्यालाही शुल्क नाही अशी जगात नसेल अशी ही संस्था आहे..'' 

ते पुढे म्हणाले, '' हाताला रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नवीन उद्योग आणण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र उद्योग, परदेशी गुंतवणूकमध्ये आघाडीचे राज्य असून देशातील एकूणपैकी ५२ टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. गड किल्ल्यांच्या विकास, तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी या नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे आराखडे करत आहोत. महाराष्ट्राला शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आदींमध्ये आधुनिक बनविण्याचा प्रयत्न करत आहोत. '' 

  मंत्री दादा भुसे म्हणाले, '' राज्यात वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीला अनुदान, वारकरी बांधवांसाठी साहित्य याशिवाय येणाऱ्या काळात किर्तनकारांना सन्मान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून पुढील काम सुरू आहे.''  

 हभप मारोती महाराज कुरेकर म्हणाले की, संतांच्या शिकवणीचा, वाङमयाचा विसर पडू नये यासाठी काम करणारी ही वारकरी शिक्षण संस्था आहे. वारकऱ्यांना अध्यात्मिक समाधान मिळवून देण्यासाठी संस्था कार्य करत आहे. संस्थेच्या गरजा शासनामार्फत पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  हभप रामराव महाराज ढोक म्हणाले, '' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या सन्मान केला. हजारो कीर्तनकार निर्माण करण्याचे काम शंतीब्रह्म हभप मारोती महाराज कुरेकर यांनी केले. या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकार रस्ता तयार करते, त्यावर कसे चालावे हे वारकरी संप्रदाय शिकवतो असेही ते म्हणाले.

हभप बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

------------------------------------------