वृक्षारोपण करण्याचे नवीन तंत्रज्ञानाही आत्मसात करा – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, ता. ६ : '' पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाद्वारे शहराच्या विविध भागात वृक्षारोपण करण्याचे काम सातत्याने सुरू असते. परंतु केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्या वृक्षाचे संरक्षण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी वृक्षारोपण करण्याचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे '', असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने आयोजित उद्यान देखभाल आणि व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज शेठीया, माणिक चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, उद्यान अधिक्षक योगेश वाळूज, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, उद्यान तज्ञ मार्गदर्शक रोहिदास घोडेकर, वृक्ष संवर्धन तज्ञ विवेक राणे यांच्यासह महापालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, वृक्षारोपण करताना मातीमध्ये कोणता घटक मिसळणे आवश्यक आहे, पाणी किती गरजेचे आहे, खड्डा कसा असावा, याबाबतचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम खूपच उपयुक्त ठरतात. पुढील काळात प्रत्येक तीन ते चार महिन्यात असे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत. पिंपरी चिंचवड शहरात ४८ टक्के ग्रीन कव्हर आहे. हे प्रमाण आणखी वाढण्यासाठी उद्यान विभागाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शहरातील प्राधिकरण, चिंचवड, नाशिक रस्ता याभागातील झाडांची संख्या जास्त आहे. आता नव्याने विकसित होणाऱ्या वाकड, पुनावळे, ताथवडे याभागातील झाडांची संख्या वाढवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील नव्याने विकसित होत असलेल्या तसेच मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला कशा पद्धतीने वृक्षारोपण करता येईल, याचेही नियोजन उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाने करावे, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.
बेकायदा वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी उपाययोजना
आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी पिंपरी चिंचवड शहराची ओळख बेकायदा वृक्षतोडीला आळा घालणारे शहर करण्याच्या दृष्टिने यंत्रणा सक्षम करण्याचे नियोजन सुरू असल्याचेही सांगितले. महानगरपालिकेत सर्वात जास्त तक्रारी या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत येतात. हे प्रकार थांबण्यासाठी योग्य यंत्रणा उद्यान व वृक्ष संवर्धन उभारावी. वृक्ष प्राधिकरण समितीकडे वृक्ष तोडणीसाठी करण्यात येणारा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी दिले.
मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांनी प्रास्ताविक करताना आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्था, विविध संघटना प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
--------------