उल्लेखनीय कामगिरीबद्दल पीएमआरडीएच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
पुणे, ता. २३ : शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तृतीय क्रमांक मिळवला. या कामगिरीबद्दल महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. या विशेष मोहिमेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पीएमआरडीएचे नाव राज्यस्तरावर पोहोचल्याने संबंधितांचा सत्कार ग.दि. माडगूळकर सभागृहात शुक्रवारी (ता. २३) महानगर आयुक्त, अतिरिक्त महानगर आणि मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनातर्फे नुकतीच १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम राबवण्यात आली. यात उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे पीएमआरडीएला राज्य स्तरावर तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह इतर संस्थांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच पीएमआरडीएला हे यश मिळाल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या सर्वांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, प्रशासन विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विभागाअंतर्गत स्पर्धेतील यश
या विशेष मोहिमेअंतर्गत पीएमआरडीए कार्यालयातील विभागअंतर्गत स्पर्धा घेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. यात अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाने प्रथम, जमीन व मालमत्ता विभाग द्वितीय आणि अभियांत्रिकी विभाग यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यासह बांधकाम क्षेत्रातील संघटना, पीएमआरडीएअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध खाजगी एजन्सीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
------------------