शाश्वत विकासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पाऊल अभिमानास्पद : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, ता. १० : शहरात पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकास प्रकल्प राबविण्यासाठी हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. ही केवळ पिंपरी चिंचवड शहरासाठीच नव्हे तर राज्य सरकारसाठी देखील अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, हरित कर्ज रोख्यांच्या (ग्रीन बाँड्स) माध्यमातून २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. या ऐतिहासिक यशानंतर मंगळवारी मुंबई शेअर बाजारात (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) हरित कर्ज रोख्यांच्या लिस्टिंग निमित्ताने बेल रिंगिंग समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन प्रसंगी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, डॉ. के. गोविंदराज, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी , बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक प्रवीण जैन, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ए. के. कॅपिटल प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती मित्तल यांच्यासह महापालिका व मुंबई शेअर बाजारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोखे इश्यू करताच पहिल्या मिनिटातच १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. ही अभिमानास्पद गोष्ट असून यावरून महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महापालिका यावर गुंतवणूकदारांचा असणारा विश्वास दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्युनिसिपल बाँडद्वारे जास्तीत जास्त निधी उभारावा, यासाठी सातत्याने आग्रही असतात. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आघाडी घेतली आहे. बाँड लिस्टिंग करणे ही खूप क्लिष्ट गोष्ट आहे. यासाठी सहकार्य केलेल्या प्रत्येक संस्थेचे, व्यक्तीचे मी अभिनंदन करतो. तसेच हरित कर्जरोख्यांतून उभारला जाणारा निधी हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे शहरात हरित सेतूसह विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे, ही देखील चांगली गोष्ट आहे. कर्जरोख्यांतून निधी उभारण्यात आघाडी घेतल्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेला २० कोटींचे अनुदान देखील प्राप्त होणार आहे, असेही ते म्हणाले.
आमदार शंकर जगताप म्हणाले, हरित कर्ज रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. याचा फायदा पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी होईल. आगामी काळात अशाच पद्धतीने सामाजिक तसेच महापालिकेच्या इतर विकास कामांसाठी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारता येऊ शकतो का, यादृष्टिनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून शहराचा विकास अधिक गतीमान होण्यास मदत होईल.''
महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या ऐतिहासिक टप्प्यावर आनंद व्यक्त करताना सांगितले, '' पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेली ही कामगिरी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणपूरक व हवामानानुकूल नागरी विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास पिंपरी चिंचवडच्या शाश्वत भविष्याची पावती आहे. हा निधी केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर हरित विकास घडवण्यासाठी वापरण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. '' यावेळी बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती यांनीही पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करताना बीएसईच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
.....
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्तांचा सन्मान
पिंपरी चिंचवड महापालिकेने 'ग्रीन म्युनिसिपल बाँड लिस्टिंग' केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा 'लिस्टिंग सन्मानचिन्ह' देऊन गौरव करण्यात आला. हे सन्मानचिन्ह 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' यांच्या वतीने देण्यात आले.
----------------......
