'शाळा व्यवस्थापन समिती संवाद' कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे प्रतिपादन
पिंपरी, २५ : शिक्षण क्षेत्र हे अविरत चालणारे काम आहे, येणाऱ्या १० वर्षात आपण सगळे मिळून या क्षेत्रात मोठा बदल करू शकतो, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (ता. २४) निगडी येथे केले
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. २४) निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात 'शाळा व्यवस्थापन समिती संवाद' आयोजित करण्यात आल आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह बोलत होते
या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात आणि प्रशासन अधिकारी संगिता बांगर, प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्य उपस्थित होते.
आयुक्त सिंह यांनी मार्गदर्शन करताना येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये क्रीडा शिक्षकांची संख्या ६४ पर्यंत वाढवली जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'भारत भ्रमण' सारखे नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत संगणकीय प्रशिक्षणासाठी लवकरच प्रशिक्षक उपलब्ध केले जाणार आहेत. जूनच्या अखेरीस हिंदी, मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा शिकवणारे शिक्षक रुजू होतील आणि येणाऱ्या १५ जुलैपर्यंत बालवाडी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू देऊन महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांचा सन्मान करण्यात आला. मुलांनी बनवलेल्या कलाकृती पाहून आयुक्त शेखर सिंह यांनी महानगरपालिकेला भेट देणाऱ्या पाहुण्यांना यापुढे विद्यार्थ्यानी बनवलेल्या भेटवस्तू दिल्या जातील, अशी घोषणा केली. विद्यार्थ्यांची कलाकृती ही महानगरपालिकेत आलेल्या पाहुण्यांना देणं अभिमानाची गोष्ट असे म्हणत त्यांनी इंद्रायणीनगर आणि पुनावळे शाळेच्या कार्यपद्धतीचेही कौतुक केले.
सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, '' पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांना दिलेल्या अनुदानामुळे शाळांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे..विद्यार्थी संख्येनुसार शाळांना विशेष अनुदान वितरित करण्यात आले. या अनुदानाचा अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अनुदानाचा वापर शाळांनी विविध उपक्रमांसाठी केला आहे.''
या संवाद सत्रात प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी शिक्षण, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ यांनी 'बाल लैंगिक शोषण शाळेची भूमिका' या विषयावर मार्गदर्शन केले. तर चिकू पिकू फाऊंडेशनच्या सहसंपादिका जुई चितळे यांनी 'मुलांच्या शिक्षणात पालकांची साथ' या विषयावर मार्गदर्शन केले.
------
