शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण
पिंपरी, ता. ८ : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्ता सर्वेक्षणामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. या द्वारे शहरातील प्रत्येक मालमत्तेचे अत्यंत सुक्ष्म मोजमाप करण्याचा महापालिकेचा मानस आहे. असा पथदर्शी उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली महापालिका ठरणार असून इतर शहरे देखील या महत्वाकांक्षी उपक्रमाचे अनुकरण करतील, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. ड्रोन आकाशात उडवून या उपक्रमाचा शुभारंभ आज पिंपरी येथील एच.ए. मैदानावर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी नाना मोरे, राजाराम सरगर, शीतल वाकडे, स्थापत्य कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक प्रशांत डोईफोडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी यांच्यासह करसंकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ड्रोन सर्वेक्षणातून मालमत्तांचे स्थळदर्शक नकाशांचे संगणकीकरण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेली सर्व माहिती संगणकीकृत करुन डिजीटल फोटोसह कर मुल्यांकन संगणक आज्ञावलीमध्ये एकमेकांस मालमत्ता निहाय जोडली जाणार आहे. त्यामुळे कर आकारणी संबंधातील करपात्र क्षेत्रफळ, नकाशा, मालमत्तेचा फोटो व कर आकारणी एकत्रितपणे संगणक आज्ञावलीद्वारा पाहता येणार आहे. सर्वेक्षणात शहरामधील प्रत्येक मिळकतीची नोंद होणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे असून कर संकलन विभागाचा महसूल दिड हजार कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
---------