शहरात बचत गटातील महिलांमार्फत मालमत्ता कर बिलांचे वाटप
पिंपरी, ता. ६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता कर संकलन सुरू आहे. मालमत्ताधारकांना बिलांचे महिला बचत गटांच्या महिलांमार्फत घरोघरी जाऊन बिल वाटप करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांनी निवासी, बिगर निवासी औद्योगिक व इतर मालमत्ताधारकांपर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेट घेत बिलांचे वितरण केले आहे.
मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अद्याप ज्या मालमत्ताधारकांना अजूनही ऑनलाईन अथवा घरपोच स्वरूपात बिल प्राप्त झाले नसेल, त्यांनी कर संकलन विभागाशी संपर्क करून बिल प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
बिलासोबतच दिली जात आहे जप्तीपूर्व नोटीस
थकबाकीदार मालमात्ताधारकांना प्रत्येक वितरित बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस देखील दिली जात आहे. आतापर्यंत ३२ हजार ५०० थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली असून त्यांनी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा कर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
…….
कोट
मालमत्ताधारकांना बिल वाटप करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर कर भरावा. ही प्रक्रिया केवळ महसूल वाढवण्यासाठी नाही, तर शहराच्या विकासासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेत कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडत कर लवकरात लवकर भरावा.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
.....
कोट
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ३१ मे २०२५ पर्यंत शंभर टक्के मालमत्ता कर बिलांचे वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सर्व मालमत्ताधारकांनी तातडीने ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने कर भरणे आवश्यक आहे. अन्यथा, मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल. जर अजूनही तुमचे मालमत्ता कर बिल प्राप्त झाले नसेल, तर तुमच्या परिसरातील कर संकलन विभागीय कार्यालयाशी संपर्क करुन बिल प्राप्त करुन घेण्यात यावे.
- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
---------