24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

शहराचे नाव जिजाऊ नगर करावे - आ. उमा खापरे

पिंपरी, ता. १२ : '' पिंपरी-चिंचवड शहराचे नाव " जिजाऊ नगर " करून राजमाता जिजाऊ यांचा गौरव करण्यात यावा '', अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनात केली.

   मुंबई, विधान भवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी ( ता. ११) आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधीद्वारे सभापतींकडे मागणी करताना सांगितले, '' पिंपरी, चिंचवड, भोसरी या गावांच्या एकत्रीकरणाने पिंपरी चिंचवड शहराची स्थापना करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहराला इंग्रजीमध्ये "पीसीएमसी"असे संबोधण्यात येते, हे संयुक्तिक नाही. जर पिंपरी चिंचवड शहराला "जिजाऊ नगर" नाव दिले तर शहराचा पूर्वीचा ऐतिहासिक वारसा जपणूक केल्यासारखे होईल. तसेच राजमाता जिजाऊ यांचा तो सन्मानदेखील ठरेल. राजमाता जिजाऊ यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या शहराला झालेला आहे. राजमाता जिजाऊ यांनी दापोडी मधील महादेव मंदिरात दर्शन घेतल्याचे इतिहासात नोंद आहे. तसेच चिंचवड गावातील महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या मंगलमूर्ती वाड्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे इतिहासात नमूद आहे. आत्ताचे भोसरीगाव म्हणजे राजा भोज यांची भोजापूर नगरी असल्याचा उल्लेख देखील शीलालेखात नोंद आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी यापूर्वी भक्ती-शक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश हिरामण बारणे तसेच शहरातील अनेक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार उमा खापरे यांनी वरिष्ठ सभागृहात ही मागणी केल्यामुळे हा विषय आता लवकर मार्गी लागेल अशी आशा पिंपरी चिंचवड शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे. 

-----------------------------------------------------------------