शहर पर्यावरणपूक ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील
पिंपरी, ता. ५ : आपले शहर स्वच्छ,सुंदर तसेच पर्यावरणपूक ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. शहरवासियांचादेखील याबाबतीत सहभाग मिळत आहे असे सांगून आयुक्त शेखर सिंह यांनी पर्यावरण दिनानिमित्त फक्त वृक्षारोपण करून दिवस साजरा न करता प्रदूषण टाळण्यासाठी प्लॅस्टिक मुक्ती, वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांऐवजी सायकलचा वापर यासारखे उपक्रम घेण्याचे आवाहन बुधवारी (ता. ५) निगडी येथे केले.
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.या दिनानिमित्त दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने वृक्षारोपण तसेच १० हजार वृक्षरोपट्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान अधिकारी प्रणव ढवळे, मनिषा मगर, उद्यान विभागातील कर्मचारी, माळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे तसेच ग्रीन यात्रा संस्थेचे दीपक सर्गल तसेच स्वानंदी महिला संस्था रावेत, सावित्री भजनी मंडळ , ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब सदस्य सहभागी झाले होते.
५ जून ते १२ जून दरम्यान महापालिका व देवराई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत देशी वृक्ष वाटपाच्या या कार्यक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. या कार्यक्रमात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण तसेच उपस्थितांना वृक्ष रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
कोट-
● पिंपरी चिंचवड शहराच्या संतुलीत पर्यावरणासाठी हरित सेतू प्रकल्प राबविणार.
● दैनंदिन जवळपासच्या प्रवासासाठी नागरिकांनी सायकलचा वापर करावा यासाठी प्रयत्न करणार
● विकास आराखड्यातील मोठ्या रस्त्यांवर दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार.
● सायकलींचा वापर वाढविण्यासाठी आवश्यक तेथे सायकल मार्ग (ट्रॅक) करणार.
● प्रस्तावित निगडी मेट्रो स्थानकापासून पर्यावरण पूरक रस्ते, सायकल ट्रॅक यांचे सुयोग्य नियोजन करणार
- आयुक्त शेखर सिंह
दुर्गादेवी टेकडी येथे उपस्थित शेकडो नागरिकांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत "आम्ही भारताचे नागरिक शपथ घेतो की, आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, आमच्याकडून या वसुंधरेला या पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटीबध्द राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही तसेच जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला व वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू" अशी शपथ घेतली.
या उपक्रमासोबतच महापालिकेमध्ये आठही प्रभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण घोडके यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
---------