शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक कार्यालय प्रथम
पुणे, ता. २३ : प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात महावितरणच्या प्रादेशिक विभाग स्तरावर पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर झाला. यात महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयास द्वितीय तर नागपूर प्रादेशिक कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
महावितरणच्या कार्यालयांतील नागरिकांसाठी सेवा सुलभता, डिजिटल ग्राहक सेवा, कार्यालयीन सोयीसुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण, कामकाजातील सुधारणा व कार्यालयीन व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियान राबविण्यात आले. यात महावितरणच्या प्रादेशिक विभागस्तरावर पुणे, कोकण व नागपूर प्रादेशिक विभाग कार्यालये सहभागी झाले होते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेच्या समितीकडून या कार्यालयांचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. त्यात पुणे प्रादेशिक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कोट
‘कार्यालयीन सुधारणा अभियानात प्रथम क्रमांक पटकावला याचे समाधान आहे. सोबतच जबाबदारी देखील वाढली आहे. वीजग्राहक हेच महावितरणच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहेत. आता पुढील १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियान अंतर्गत विविध ग्राहकाभिमुख सुधारणांना आणखी वेग देण्यात येईल’. - भुजंग खंदारे, प्रादेशिक संचालक, पुणे
-------------