स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठी भारतीय संविधानाची भूमिका महत्वपूर्ण
पिंपरी, ता. २६ : सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीयांमध्ये स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजविण्यासाठी भारतीय संविधानाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. भारताने संविधानाच्या मार्गाने वाटचाल करीत विविध यशाची शिखरे गाठली असून भारतीय संविधानाचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान दिन नुकताच उत्साहात झाला. त्यानंतर भीमसृष्टी, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त २६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानावर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनही अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते कार्यक्रमस्थळी असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादनाच्या वेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता चंद्रकांत कुंभार, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, तुकाराम गायकवाड,ओंकार पवार, पियुष घसिंग, श्रेयश जाधव, सचिन महाजन यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या २७ नोव्हेंबर रोजी प्रबोधनपर गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सकाळच्या सत्रात गौतम बद्रीके, राहुल विघ्ने, रोशन तेलतुंबडे, पंढरीनाथ गाढे, प्रभाकर भगत, संगीता भंडारे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम त्यानंतर दुपारच्या सत्रात १२ वाजता प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये विशाल ओव्हाळ, भारतबाबू लोणारे, स्वप्नील पवार, धीरज वानखेडे, शेखर गायकवाड आदी गायक आपली कला सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता भारतीय संविधानावर आधारित प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार असून सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे आणि गायिका दीक्षा वाव्हळ हे कलाकार सहभागी होणार आहेत. दुपारी ३.३० वाजता सुरप्रीत अशोक प्रस्तुत भारतीय संविधानावर आधारित गझलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायं.५ .वाजता जयेंदू मातोश्री प्रॉडक्शन, पुणे प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम सन्मान संविधानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ख्यातनाम पार्श्वगायक चंद्रकांत शिंदे आणि पार्श्वगायिका गायत्री शेलार हे कलाकार सहभागी होणार आहेत.
---------