स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी
पिंपरी, ता. १७ : शहरातील विविध भागातील रस्ते दुरुस्ती करणे, परिसरातील स्थापत्य विषयक दुरुस्ती कामे करणे, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविणे यासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. १७) झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
कस्पटे वस्ती, वेणू नगर, कावेरी नगर, विशाल नगर, पिंपळे निलख, थेरगाव, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, वाकड, पुनावळे, ताथवडे येथील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविणे तसेच मोशी, बोऱ्हाडेवाडी,नेहरूनगर, चिखली, कुदळवाडी परिसरातील किरकोळ दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करणे या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी या विशेष बैठकीमध्ये मान्यता दिली.
केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिकेच्या क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी रावेत येथे निवासी गाळे बांधण्यात येत असलेला प्रकल्प रद्द करून या प्रकल्पाचा समावेश PMAY - 2.0 मध्ये सामाविष्ट करण्यास मान्यता दिली. तसेच चिखली येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्पांमध्ये व्यापारी गाळे बांधण्यासाठी सक्सेस फी तत्वावर सल्लागार नेमण्यास देखील प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
--------------
