25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

सर्व समशानभूमींमध्ये विद्युतदाहिनी बसविणार

पिंपरी, ता. २४ : चऱ्होली येथील स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी बसविणे तसेच बोपखेल आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्याच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी सोमवारी (ता. २४ ) झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.


पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.


शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच झाडे वाचवण्यासाठी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनीचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानुषंगाने चऱ्होली येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात येणार असून त्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.


स्मशानभूमीत वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोपखेल येथील स्मशानभूमीत आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये, यासाठी पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी या बैठकीत मान्यता दिली. शहरातील स्मशानभूमीमध्ये टप्प्याटप्प्याने विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे.


१६ शाळांमध्ये झिरो वेस्ट प्रकल्प 


महानगरपालिकेच्या १०५ शाळांपैकी मे. आसरा फाउंडेशन या संस्थेला झिरो वेस्ट (शून्य कचरा) शाळा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ८ शाळा प्रायोगिक तत्वावर देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८ शाळा, दुसऱ्या टप्प्यात १६ शाळा, तिसऱ्या टप्प्यात १६ शाळा , चौथ्या टप्प्यात १६ शाळा यानुसार १०५ शाळांपैकी ५६ शाळा झिरो वेस्ट (शून्य कचरा) करण्यात आला आहे. यापुढे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यासाठी पुढील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे. 


बैठकीत मंजूर झालेले विषय


शहरातील विविध परिसरातील रस्त्यांची आधुनिक पद्धतीने दुरुस्ती करणे, शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी अडथळा येणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या स्थलांतरित करणे , विविध प्रभागातील स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आदी विषयांच्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.

-------------