संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महानगरपालि राबविणार उपाययोजना....
पिंपरी, ता. १२ : पिंपरी - चिंचवड शहरात गेल्या काही आठवड्यापासून नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे संभाव्य पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान सद्यस्थितीत जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. शहरातील बोअरवेलचे पाणी देखील आटले आहे. त्यात टँकरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. सोसायट्यामधील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणादेखील बंद आहेत, अनधिकृत नळजोड वाढले आहेत. शुद्ध पाण्याचा गाड्या धुण्यासाठी वापर केला जात आहे. या सर्व गोष्टीना आला आला घालण्यासाठी आणि नागरिकांना पावसाळ्यापर्यंत शुद्ध पाणी देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महत्वाच्या उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती तीच आज ३५ लाख झाली आहे. परंतु पाणी पुरवठा फक्त ३५ % ने वाढला आहे. तरी देखील महापालिकेच्या वतीने नागरिकांना वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु अनधिकृत पाणी वापरामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा अडथळा निर्माण होतो. यासाठी महापालिकेच्या वतीने महत्वाच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये पंपाद्वारे थेट लाईनवरील पाणी खेचण्यास बंदी व असे आढळल्यास कारवाई, अनधिकृत जोडांवर कडक कारवाई, रेन वॉटर हार्वेस्टिंगची देखभाल करणे, नवीन पाणी पुरवठा जोडला पुढील दोन महिने स्थगिती, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या व्यापारी वसाहती मधील पाणी पुरवठा थांबविण्याची शक्यता, गाड्या, रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
—-----
चौकट - १
हे करा,
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यात यावी
तेच पाणी उद्यानात ठिबक सिंचनाद्वारे द्यावे
रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था दरवर्षी तपासावी,
पाण्याच्या टाक्यांचे गळती तपासावी,
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या जुन्या सोसायट्यांमध्ये ग्रे वॉटर प्लॅट बसवावा
हॉटेल, मॉल, शाळा यांनी नळाला Aerator बसवावा त्यामुळे पाण्याची ५० टक्के बचत होते.
सोसायटी धारकांनी सोसायटीमधील पाण्याचे ऑडीट करावे.
अनधिकृत नळ जोडणी व पाण्याच्या गैरवापराची माहिती पालिकेला द्यावी
पाण्याचा टँकर खरेदी पाण्याची गुणवत्ता तपासावी
—---
चौकट २
हे करू नका..
पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करू नका,
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बंद ठेऊ नका,
अनधिकृत नळ कनेक्शन घेऊ नका,
वीज पंपाद्वारे थेट लाईनवरील पाणी खेचू नका,
गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये.
—-------
पाणी पुरवठा विभागामार्फत होणार तपासणी...
महानगरपालिकेच्या पाईप लाईनवर थेट पंप लावून पाणी खेचणाऱ्या विरोधात कारवाई होणार,
कारवाई नंतर पाणी खेचताना दिसल्यास नळ कनेक्शन बंद करणार,
बांधकाम साईट्स, कार वाॅशिंग सेंटर, यांची तपासणी होणार आहे.
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेच्या माध्यमातून निर्मिंत पाण्याचा वापर न करणाऱ्या मॉल व सोसायट्यावर कारवाई होणार,
पिण्याच्या पाण्याने गाडी व रस्ते धुणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
कोट
उन्हाळा असेपर्यंत आणि पावसाळा सुरु होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. अनधिकृत पद्धतीने पाणी वापरत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल.
अजय सूर्यवंशी ,
सह शहर अभियंता , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
----------
