' पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुलक्षणा शिलवंत नक्की निवडून येणार '
आकुर्डी, ता. १२ : ' बटेंगे तो कटेंगे ' असे म्हणत सामाजिक विषमता पसरविणाऱ्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत नक्की निवडून येणार असा विश्वास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
आकुर्डी येथील खंडोबा माळ मैदानात पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मतदारसंघातील हजारो महिला भगिनींनी तुफान गर्दी केली होती.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, '' छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवतो. मात्र भारतीय जनता पार्टी ' बटेंगे तो कटेंगे ' असे म्हणत समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात आता क्रांती घडवायची आहे. सामाजिक परिवर्तन हे विचारातून होते हे विचार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी जोपासले आहेत. ही एकटी महिला १०० जणांना भारी आहे. असे म्हणत समाजाची सेवा करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे.'' खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघर्षाच्या काळात काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाठीशी उभा राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत आपण या पक्षाच्या नेत्यांना आयुष्यभर विसरणार नाही असे सांगितले.
विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी गेल्या दहा वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारला नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त करत अशा माणसाला कसे निवडून दिले ? असा प्रश्न मतदारांना विचारला. आमदार गाड्या फिरवायला व फ्लॅट खरेदी करायला आमदार नसतो तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्याने काम करायचं असते. सुलक्षणा शिलवंत यांनी निवडून आल्यानंतर हे समाजाचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी राज्याच्या अधिवेशनाला १०० % उपस्थिती दाखवली पाहिजे, अशी मतदार म्हणून अपेक्षा असल्याचे मत त्यांनी मांडले. सुलक्षणा शिलवंत यांनी रस्ता, वीज, पाणी व न्याय यासाठी कणखर भूमिका मांडली पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या, '' काल अजित पवारांनी माझी उमेदवारी कशी कापली, याबाबत सभेत माहिती दिली. या संदर्भात सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की तुम्हाला सुशिक्षित माणसे नको का? फक्त निष्क्रिय माणसेच हवीत का? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला. शहरातील चार माणसांचा विकास म्हणजे विकास झाला का? असा प्रश्न करत पिंपरी चिंचवड शहराचा विकास आहे तरी कुठे? असे प्रश्न उपस्थित केले.
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली या आमदाराने व त्याच्या कार्यकर्त्यांनी मलिदा लाटला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. एमआयडीसीतल्या कंपन्या शहराबाहेर गेल्या. कोविड काळात हे आमदार कोठेच रिचेबल नव्हते. असे आमदार नक्की कोणासाठी काम करतात? आणि त्याचमुळे अशा निष्क्रिय उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन करण्यासाठी अजित पवारांना माझ्याकडे बघून मतदान करा असे असे म्हणावे लागते हे त्यांचे दुर्दैव असल्याचे सुलक्षणा शिलवंत यांनी सांगितले.
या सभेत माजी आमदार गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ सामाजिक नेते मानव कांबळे, काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश प्रतिनिधी स्वाती चिटणीस, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रकाश पाटील, लघुउद्योजक संघटनेचे नेते तात्या सपकाळ, माजी नगरसेविका स्मिता कुलकर्णी, आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मीना जावळे, डॉ. मनीषा गरुड, दीपमाला गोखले, शांता गवळी, सुषमा शिंदे, भारती नलावडे, वैशाली कुलथे, शिल्पा बिडकर, विश्रांती पाडळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार कामठे आदींची यावेळी भाषणे झाली.
-----