30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

पिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा

पिंपरी, ता. १८ : आई-वडील दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त असताना किंवा वर्क फ्रॉम होमच्या या जमान्यात बाळाच्या वाढीमध्ये अनेक समस्या उद्भवतात. या समस्या सोडवण्यासाठी क्रेडलवाइज कंपनीने एक अत्याधुनिक, तंत्रज्ञान युक्त, स्वयंचलित आधुनिक पाळणा तयार केला आहे. 

  या पाळण्यात ठेवलेले बाळ जागे होऊन हालचाल करू लागले की, त्याची सूचना मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पालकांना मिळते. बाळ रडण्यापूर्वीच पाळणा हळुवारपणे स्वयंचलित सुरक्षित झोके देण्यास सुरुवात करतो. त्याचे सर्व नियंत्रण दूरवरून मोबाईल द्वारे करता येते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय निर्माण होत नाही. यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या पाळण्याची सुरक्षाविषयक सर्व काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे या उत्पादनाला सुरक्षाविषयक अमेरिकेतील जेपीएमए (JPMA-Juvenile Product Manufacturing Association) आणि ग्रीनगार्ड (GREENGUARD) हे प्रमाणपत्र मिळाले आहे. याबाबत कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक किरण ब्याहटटी यांनी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत नुकतीच माहिती दिली. 



 क्रेडलवाइज हे जगातील पहिले एआय स्वयंचलित स्मार्ट क्रीब तंत्रज्ञान आता भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. बाळाच्या हालचाली ओळखून हा स्वयंचलित पाळणा बाळावर देखरेख ठेवतो आणि पालकांना मोबाईल ॲप्लीकेशनद्वारे सूचित करतो. हा पाळणा अचूकतेने, अगदी सूक्ष्म पद्धतीने काम करीत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आवाज होत नाही आणि पालकांना देखील आपला वेळ वाचवून कामात लक्ष देता येते, तसेच स्वतःची देखील व्यवस्थित झोप घेता येते.

  यावेळी क्रेडलवाईजचे उत्पादन व्यवस्थापक माधव आनंद, मनुष्यबळ संसाधन अधिकारी विशाल सातारकर व आशिष बंका, गुणवत्ता व्यवस्थापक ज्ञानेश्वर कोळगे, पुरवठा साखळी प्रमुख अनुप जोशी, वरिष्ठ लॉजिस्टिक प्रबंधक विनित प्रियदर्शी, मयूर मेश्राम, विश्वरंजन सामाल, हरीश आर., वाणी तडकापल्ली आदी उपस्थित होते.

  यावेळी किरण ब्याहटटी यांनी सांगितले, '' या आत्याधुनिक पाळण्यामुळे बाळांना पूर्ण झोप मिळण्यास व बाळाची व्यवस्थित शारीरिक व बौद्धिक वाढ होण्यास मदत होते. तसेच पालकांना देखील त्यांच्या वेळा सांभाळून बाळावर लक्ष ठेवणे सुलभ होते. हा पाळणा बाळ २४ महिन्याचे होईपर्यंत वापरता येईल.

   प्रशासन व्यवस्थापक विशाल सातारकर यांनी सांगितले की, ' क्रेडलवाइज ' ची स्थापना राधिका पाटील व भरत पाटील या दांपत्याने केली आहे. राधिका या पिंपरी चिंचवड मधील नामांकित सर्जन डॉ. नितीन गांधी यांची कन्या आहेत. राधिका यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी-चिंचवडमध्ये तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथील सीओइपी येथे झाले आहे. त्यांचे पती भरत पाटील हे देखील उच्चशिक्षित आहेत. राधिका आणि भरत या दोघांचे उच्च शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूर येथे झाले आहे.

  राधिका आणि भरत पाटील यांनी क्रेडलवाइजची स्थापना केली आहे. २०१८ मध्ये त्यांना बाळ झाल्यानंतर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक उपाय शोधत असताना अनेक वर्ष प्रयत्न करून त्यांना भेडसावलेल्या समस्येतून या बेबी टेक्नॉलॉजी कंपनीच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली आणि ' द क्रेडलवाइज ' ची निर्मिती करण्यात यश आले. या कंपनीच्या उत्कृष्ट तंत्रज्ञान कौशल्याच्या कामात इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरच्या माजी विद्यार्थी, अवॉर्ड मेडिकल स्कूल बोर्ड प्रमाणित स्त्री रोग तज्ञ एम. डी. डॉ. चित्रा अकिलेस्वरन, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील नवजात बालरोग तज्ञ एम. डी. डॉ. अनुप राव यांचा समावेश आहे.

  या उत्पादनाला फास्ट कंपनीचे नेक्स्ट बिग थिंग्स इंटेक "स्मार्ट क्रीब" आणि टाईम मॅगझिनचे "बेस्ट इन्वेंशन्स अवॉर्ड" हे पुरस्कार मिळाले आहेत. या पाळण्याचे अमेरिकेत व भारतात पेटंटची नोंदणी झाली आहे. या अत्याधुनिक पाळण्याची अंतिम बांधणी क्रेडलवाइज कंपनी, हिंजवडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे करण्यात येत आहे.

------------