31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि कोरियाच्या विद्यापीठामध्ये सामंजस्य करार

पिंपरी, ता. २४ : भारत आणि कोरिया यांच्यामध्ये शिक्षण, संस्कृती आणि जागतिक स्तरावरील रोजगार, उद्योग, व्यापाराच्या अनेक संधी नव्याने निर्माण होत आहेत. यासाठी या दोन्ही राष्ट्रांमध्ये शैक्षणिक, पर्यटन संवाद (एज्युकेशनल टुरिझम टॉक) होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने सुरू केलेले काम भारत कोरिया यांच्यातील दुवा ठरेल. हा करार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी एक यशस्वी माध्यम ठरणार आहे असा विश्वास केटीओ इंडिया क्षेत्रीय संचालक मायॉंग किल युन यांनी व्यक्त केला.

 पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशन (केटीओ) च्या सहकार्याने पुण्यात आयोजित कोरियन एज्यू टूर रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मायॉंग किल युन बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र शासन, उच्च शिक्षण संचालनालय संचालक महाराष्ट्र शासन डॉ. शैलेश देवळलणकर, पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच राज्यभरातून १२५ हून अधिक शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते. 

   कोरिया देश हा के-ड्रामा, के-पॉप आणि खाद्यसंस्कृती सह आता नवोन्मेष, शैक्षणिक गुणवत्ता आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम म्हणून ओळखला जाईल.

त्यासाठी कोरियाचे प्रतिनिधी म्हणून भारतातील शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना कोरियाशी संबंध निर्माण करण्यात आणि त्यांच्या बहुआयामी संधी शोधण्यात मार्गदर्शन करण्यासाठी करण्यासाठी काम करत आहोत, असे मायॉंग किल युन यांनी सांगितले.

   डॉ. शैलेश देवळलणकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच दक्षिण कोरिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे. महाराष्ट्रभर एक दिवस कोरियन शिक्षण प्रणालीला समर्पित करून साजरा करण्याचा विचार व्हावा. स्टडी इन कोरिया या उपक्रमाअंतर्गत अशा शैक्षणिक मेळाव्यांचे आयोजन कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनद्वारे (केटीओ) होऊ शकते. लवकरच भारतात एक कोरियन विद्यापीठ स्थापन होण्याची शक्यता आहे. या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे भारत कोरियाचे संबंध अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

   महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या देवाण-घेवाण कार्यक्रमांसाठी, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी, उद्योग क्षेत्रातील भेटींसाठी किंवा इंटर्नशिप संधींसाठी आवश्यक त्या सर्व सहकार्याला तयार आहे. महाराष्ट्र हे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने भारतातील एक सर्वोत्तम राज्य आहे. येथे विविध प्रकारची उद्योगनिर्मिती आणि शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. असेही डॉ. शैलेश देवळलणकर यांनी सांगितले. 

    डॉ. गिरीश देसाई म्हणाले, '' या माध्यमातून कोरियाला एक प्रमुख शैक्षणिक ओळख देण्याची संधी मिळाली. सांस्कृतिक अनुभव, शैक्षणिक विनिमय आणि अभ्यास दौऱ्यांच्या दृष्टीने दक्षिण कोरिया हे अत्यंत समृद्ध केंद्र आहे.'' पीसीईटी, पीसीयूने अलीकडेच कोरियातील सॅमयुंग विद्यापीठ (Sangmyung University) आणि कांगओन नॅशनल युनिव्हर्सिटी (Kangwon National University) या नामांकित शैक्षणिक संस्थांबरोबर पिंपरी चिंचवड विद्यापीठाने शिक्षण, रोजगार आणि संशोधनाच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार केले आहेत.

_____________