पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आता स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
पिंपरी, ता. ९ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे अभिनामाचे पद नव्याने निर्माण करण्यासह विविध पदांवर नियुक्त्या करण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. ८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
या सभेत उप - मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर आनंद गायकवाड, पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर सोहन निकम, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर महेश कावळे, संतोष दुर्गे, समीर दळवी तसेच ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ. वर्षा घोगरे आणि डॉ. शंकर मोसलगी, निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर लक्ष्मीकांत अत्रे आणि सहाय्यक आयुक्त या पदावर नाना मोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे अभिनामाचे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात आपत्ती संबंधीत घटकांचे नियोजन करण्यासाठी तसेच शहरातील आपत्ती विषयक बाबी हाताळण्यासाठी पूर्णवेळ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची आवश्यकता होती. त्यानुसार महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर या पदाची निर्मिती करण्याचे प्रस्थावित होते. या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे रिक्त पद पदोन्नतीने भरण्यासाठी लेखाधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव , कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणकीय अर्हता, आणि शिस्तभंग विषयक कारवाई आदी सेवाविषयक तपशील पडताळून आणि शासन मान्यतेच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर आनंद गायकवाड यांची पदोन्नतीने सर्वानुमते शिफारस करण्यात आली होती. त्यानुषंगाने या सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी नियुक्ती करण्याच्या विषयास मान्यता दिली.
आस्थापनेवरील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी या अभिनामाची १६ रिक्त पदे भरण्याचे शासन मंजूर आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ. वर्षा घोगरे आणि डॉ. शंकर मोसलगी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास महापालिका सभेत मान्यता देण्यात आली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर निवासी वैद्यकीय अधिकारी अभिनामाची २ पदे शासन मंजूर आहे. त्यानुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाजेष्ठतेनुसार निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ. लक्ष्मीकांत अत्रे यांना पदोन्नतीने नियुक्त करण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली.
तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त या अभिनामाची १४ पदे शासन मंजूर आहे. त्यानुसार नाना मोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मान्यता दिली आहे.
----------------
