पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘ हरित सेतू ’ प्रकल्पासाठी ब्रँड डिझाइन स्पर्धेचे आयोजन
पिंपरी, ता. ७ : पिंपरी चिंचवड शहराला भारतातील सर्वात उत्तम राहण्यास योग्य आणि नागरिक केंद्रित असणाऱ्या शहरांपैकी एक बनवण्याच्या दिशेने महानगरपालिका अनेक नागरी विकास उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचा एक भाग ‘ हरित सेतू ’ प्रकल्प असून या अनुषंगाने विशेष ब्रँड डिझाइन स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी नोंदणी ९ जून २०२५ पासून सुरू होणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच विशेष ज्यूरी पारितोषिकही देण्यात येणार आहे.
‘ हरित सेतू ’ उपक्रमामार्फत महानगरपालिका पादचारी केंद्रित रस्ते, सुसंगत पार्किंग व्यवस्था, मजबूत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आणि सुरक्षित चौक यावर भर देत आहे. ही संकल्पना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षम, समावेशक आणि शाश्वत वाहतूक प्रणालीच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे.
याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले की, '' पिंपरी चिंचवड शहराने आता केवळ औद्योगिक शहर म्हणून ओळख मर्यादित न ठेवता एक प्रगत आणि नागरिकांच्या पसंतीचं शहर म्हणून ओळख निर्माण केली आहे. ‘ हरित सेतू ’सारख्या उपक्रमांद्वारे वैज्ञानिक नियोजन आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा संगम घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
देशभरातील सर्व डिझायनर्ससाठी स्पर्धा खुली
ही स्पर्धा देशभरातील सर्व डिझायनर्ससाठी खुली आहे. सहभागी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्यात समन्वय साधण्याचे काम असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया करणार आहे. स्पर्धेचे परीक्षण असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ सदस्य व व्यावसायिक डिझायनर्सच्या परीक्षक मंडळाद्वारे केले जाईल. स्पर्धेदरम्यान सहभागासाठी असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाद्वारे कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजनही केले जाणार आहे.
महानगरपालिका व असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियामध्ये झाला करार
पिंपरी चिंचवड महापालिका व असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया यांच्यामध्ये हरित सेतू सह वेगवेगळ्या प्रकल्पाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण करार झाला. यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण महाजन, पुणे विभाग अध्यक्ष योगेश दांडेकर, खजिनदार पुष्कर इंगळे, संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य ऋग्वेद देशपांडे, बारिष दाते, अमोल गिझरे आदी उपस्थित होते.
.....
चौकट
स्पर्धेचा कालावधी :
* नोंदणी सुरू : ९ जून २०२५
* सहभागींसाठी वेबिनार : १४ जून २०२५
* अंतिम सादरीकरण दिनांक : २७ जून २०२५ (www.adiawards.org वरून सादर करावे)
* निकाल : १० जुलै २०२५
.....
कोट
डिझाइन क्षेत्राचा सार्वजनिक प्रकल्पांमधील महत्त्वाचा वाटा अधोरेखित करण्यासाठी असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया कटिबद्ध आहे. १३ शहरांमध्ये आणि १४ शैक्षणिक संस्थांमध्ये आमचे नेटवर्क आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिक सर्वांनाच हरित सेतू सारख्या प्रकल्पात सहभागी होता येईल.
- योगेश दांडेकर, असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया पुणे अध्यक्ष
--------------
