पिंपळे गुरवला ‘ स्वच्छता ही सेवा ’ उपक्रम उत्साहात
पिंपरी, ता. १ : '' आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहू आणि त्यासाठी वेळही देऊ. दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवडयातुन २ तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्प पूर्ण करू, आम्ही स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही, '' अशी संकल्पपूर्वक शपथ ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक व विद्यार्थ्यांनी आयुक्त शेखर सिंह, सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १) पिंपळे गुरव येथे घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर, जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘ स्वच्छता ही सेवा ’ उपक्रम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयामध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, माजी नगरसेवक शंकर जगताप, सागर अंघोळकर, संतोष कांबळे तसेच महेश जगताप, राहुल जवळकर, माजी नगरसेविका उषा मुंढे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, ब्रॅन्ड ॲम्बेसिडर यशवंत कन्हेरे, सुरेश डोळस, आदिती निकम, संगीता जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, मुकेश कोळप, श्रीकांत कोळप, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे तसेच इसीए संस्थेचे पदाधिकारी, केपीएमजीचे विनायक पद्मने आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
आपले शहर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि एकमेकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. याची सुरूवात प्रत्येकाने सर्वात आधी आपल्या घरापासून करायला हवी जेणेकरून स्वच्छतेचा संदेश एका कुटुंबापासून अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचेल. शहरातील वातावरण पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबवित असते. या शहरातील नागरिक महापालिकेच्या या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद देत असून ओला सूका कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहून सहकार्य करत असतात, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रभागनिहाय कार्यरत असणाऱ्या स्वच्छतादूतांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामध्ये संघराज बेगडे, आनंदा मोरे, अमोल चंदनशिवे, संतोष काटे, मिलींद पात्रे, पुंडलिक साळुंखे, सुभाष दंडवळ, निकेश सरोदे, बाळासाहेब कोडी, संगीता जाधव, गंगाबाई गोडे, माधुरी पाटील, सुरेखा गोडे या स्वच्छतादुतांचा समावेश होता. तर पर्यावरणविषयक कामकाज करणाऱ्या पर्यावरण संवर्धन संघटना, रिपब्लिकन वाहतूक आघाडी विश्वशांती रिक्षा संघटना तसेच संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
----------------------
