31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी

पिंपरी, ता. ५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरीमधील मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयाने नेत्र उपचार सेवांमध्ये भरीव सुधारणा करत नवीन नेत्र शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी केली आहे. या कक्षाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.

यामुळे आता दररोज ३० ते ३५ शस्त्रक्रिया करणे शक्य होणार असून, यापूर्वीची २० ते २५ शस्त्रक्रियांची सरासरी क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. परिणामी, रुग्णांच्या प्रतीक्षेचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


या नवीन शस्त्रक्रिया कक्षात उच्च दर्जाचे मायक्रोस्कोप आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बसविण्यात आली असून हे साहित्य कॉटकॅम इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. या संस्थेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेचे उदघाटन कॉटकॅम इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अर्जुन सिरूर यांच्या हस्ते करण्यात आले.


या उद्घाटन प्रसंगी मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि सीएसआर प्रमुख निळकंठ पोमण, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सीएसआर सेलचे विजय वावरे व डॉ. महेश गौरी आणि त्यांची टीम यांनी केले.


मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालय हे महानगरपालिकेच्या वतीने चालवले जाणारे एक स्वतंत्र नेत्र उपचार केंद्र असून, परिसरातील रहिवासी, ग्रामीण भागातील नागरिक आणि एमआयडीसी परिसरातील कामगारवर्गासाठी ही सेवा विशेषतः महत्त्वाची आहे. याआधी मर्यादित साधनसंपत्तीमुळे रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता नव्या उपकरणांमुळे वर्षभरात सुमारे ४,५०० अधिक (सुमारे ५० टक्क्यांची वाढ) रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.


या विस्तारामुळे रुग्णांवरील आर्थिक भार देखील कमी होणार असून, प्रतीक्षेमुळे होणारे नुकसान टळेल आणि वेळेवर नेत्र उपचार उपलब्ध होणार आहेत. यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

--------------